मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 जुलै 2025
मुंबई, – गावदेवी परिसरात एका वयोवृद्धाला डॉक्टरची अपॉईटमेंट एक लाखांना पडली. अपॉईमेंटसाठी बोगस लिंक पाठवून अज्ञात सायबर ठगाने ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन अज्ञात सायबर ठगाचा शोध सुरु केला आहे.
विजय धनेशचंद्र पाठक हे 69 वर्षांचे वयोवृद्ध गावदेवी येथे राहतात. 19 जुलैला त्यांना डॉ. हार्दिक शहा यांची अपॉईमेंट घ्यायची होती, त्यामुळे त्यांनी त्यांना कॉल केला, मात्र त्यांचा कॉल लागला नाही. त्यामुळे त्यांनी गुगलवर डॉ. शहा यांचा दुसरा मोबाईल क्रमांक मिळतो का यासाठी सर्च केले होते. तिथे त्यांना एक मोबाईल क्रमांक सापडला होता. या मोबाईलवर कॉल केल्यानंतर समोरील व्यक्तीने त्यांना सोमवार 21 जुलैची अपॉईमेंट दिली होती.
काही वेळानंतर याच व्यक्तीने त्यांना कॉल करुन त्यांची अपॉईमेंट कन्फर्म झाली नसून त्यांना हॉस्पिटलच्या अॅपमधून अपॉईमेंट घ्यावी लागेल असे सांगून त्यांना एक अॅपची लिंक पाठविली होती. त्यामुळे त्यांनी ते अॅप ओपन करुन त्यात स्वतची माहिती अपलोड करुन अपॉईटमेंटसाठी दहा रुपये ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला. मात्र दहा रुपये डेबीट झाल्याचा मॅसेज न आल्याने त्यांनी पुन्हा पैसे पाठविले नाही. 23 जुलैला त्यांच्या मोबाईलवर बँकेचे तीन मॅसेज आले होते. त्यात त्यांच्या बँक खात्यातून 3 हजार, 49 हजार आणि 48 हजार रुपये असे एक लाख रुपये डेबीट झाल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे त्यांनी हा प्रकार त्यांच्या मुलालाद सांगितला.
डॉक्टरची अपॉईटमेंटसाठी घेण्यासाठी अज्ञात सायबर ठगाने बोगस लिंक पाठवून त्यांच्या बँक खात्याची माहिती काढून ही फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी घडलेला प्रकार गावदेवी पोलिसांना सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी या ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.