विदेशात नोकरीच्या आमिषाने बेरोजगार तरुणांची फसवणुक
सतरा तरुणांना 67 लाखांना गंडा घालणारा भामटा अटकेत
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 जुलै 2025
मुंबई, – विदेशात नोकरीच्या आमिषाने चार राज्यातील सतराहून अधिक बेरोजगार तरुणांना बोगस नोकरीचे ऑफर लेटर, व्हिसा अणि विमान तिकिट देऊन फसवणुक करुन पळून गेलेल्या एका सराईत भामट्याला गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. मोहम्मद शफीक मोहम्मद हनीफ खान असे या 42 वर्षीय भामट्याचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मोहम्मद शफीकविरुद्ध ठाण्यासह हरियाणातील दोन पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अटकेने अशाच इतर काही फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात मोहम्मद शफीकविरुद्ध एक गुन्हा दाखल झाला होता. विदेशात नोकरीसाठी इच्छुक असलेल्या सात बेरोजगार तरुणांना त्याने न्यूझीलंड व अझरबैजान या देशात नोकरीचे आमिष दाखविले होते. नोकरीसाठी प्रोसेसिंग फी, व्हिसा, विमान तिकिटासाठी त्यांच्याकडून सुमारे 36 लाख रुपये घेतले होते. त्यानंतर त्यांना बोगस नोकरीचे ऑफर लेटरसह व्हिसा आणि विमान तिकिट देण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्यानंतर या सातही तरुणांना त्यांच्याकडील व्हिसा, नोकरीचे ऑफर लेटर आणि विमान तिकिट बोगस असल्याचे उघडकीस आले. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच या तरुणांनी आग्रीपाडा पोलिसांत धाव घेतली होती. तिथे घडलेला प्रकार सांगून त्यांनी मोहम्मद शफीकविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या गुन्ह्यांत आग्रीपाडा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते. हा तपास सुरु असताना त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त दिनकर शिलवटे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस निरीक्षक प्रशांत गावडे, सहाय्यक फौजदार मंगेश सावंत, अविनाश निंबाळकर, पोलीस हवालदार योगेश उत्तेकर, रविंद्र राणे, अमोल साळुंखे, महेश्वर पाडवी, किशोर पवार, प्रशांत थिटमे, सचिन कांबळे, महिला पोलीस शिपाई वर्षा चव्हाण, पोलीस शिपाई स्वप्निल डेरे, सुनिल हरड, संदीप आव्हाड, पाटील, शिंदे यांनी पळून गेलेल्या मोहम्मद शफीकला शिताफीने अटक केली.
तपासात तो ठाण्याच्या मुंब्रा परिसरातील रहिवाशी आहे. त्याने अनेकांना विदेशात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखविले होते. त्यासाठी त्याने स्वतची एस. के इंटरप्रायजेस मॅनपॉवर जॉब कन्सलंटन्सी नावाची एक कंपनी सुरु केली होती. भाड्याने ऑफिस उघडून त्याने अनेकांना विदेशात नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले होते. मोहम्मद शफीकने मुंबईसह हरियाणा, गुजरात, पंजाब, कोलकाता या चार राज्यातील सतरा बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून आतापर्यंत 67 लाख रुपये उकाळल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
या सर्व तरुणांना बोगस नियुक्तीचे ऑफर लेटर, व्हिसा आि तिकिट देऊन तो पळून गेला होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता त्याच्याविरुद्ध ठाणे उपनगर, हरियाणाच्या कर्नाल पोलीस ठाण्यात अशाच दोन फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या आरोपीने अशाच प्रकारे इतर काही बेरोजगार तरुणांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्याच्या चौकशीतून इतर काही फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.