मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 जुलै 2025
मुंबई, – कुर्ला येथील एलबीएस मार्गावरील सुहाना प्रोजेक्टच्या कन्स्ट्रक्शन कामाच्या सुमारे 56 लाख रुपयांचा अपहार करुन एका व्यावसायिकाची फसवणुक केल्याप्रकरणी निरज मनसुखलाल वेद या वॉण्टेड आरोपी व्यावसायिकाला चार वर्षांनी बोरिवली पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
रमेश वेलजी उकानी ऊर्फ रमेश पटेल हे व्यावसायिक असून ते दहिसर येथे राहतात. त्यांची जे. के कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी असून ही कंपनीत कन्स्ट्रक्शन क्षेत्रात कार्यरत आहे. 2018 रोजी त्यांचा मित्र शराफत उल्लाखान यांनी त्यांच्या एक परिचित बिल्डर असून त्याचे कुर्ला येथे एका नवीन प्रोजेक्ट सुरु असल्याची माहिती सांगून त्याच्यासोबत काम करण्याची ऑफर दिली होती. ठरल्याप्रमाणे त्यांची संबंधित बिल्डरशी मिटींग झाली होती. या मिटींगमध्ये त्यांची कंपनी एनआरजे कन्स्ट्रक्शन कंपनीला मजूरासह कच्चा माल पुरविण्याबाबत एक करार झाला होता. या करारानंतर त्यांनी त्याच्या कंपनीला 3 कोटी 37 लाख रुपयांचे कोटेशन पाठवून दिले होते.
काही दिवसांनी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर नितीनभाई त्यांच्याकडे आले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या कंपनीच्या कुर्ला येथील एलबीएस रोड, सुहाना प्रोजेक्टच्या कामाची वर्क ऑर्डर दिली होती. वर्क ऑर्डर प्राप्त होताच त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली होती. यावेळी एनआरजे कंपनीकडून त्यांना तीन टप्यात 41 लाख रुपये देण्यात आले होते. जुलै 2018 रोजी निरज वेद याने त्यांच्यासह त्यांच्या मजुर काम करत असलेल्या साईटवर दुसर्या कन्स्ट्रक्शनचे कामगार पाठवून दिले होते. त्याने त्याची कंपनी आता कच्चा माल पुरविणार असून लेबर कन्ट्रक्शनचे काम तोच पाहणार असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांनी त्याला त्यांच्या कामाचे बिल तयार करण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांनी सुहाना कन्स्ट्रक्शनसाठी वापरलेल्या कच्च्या मालाचे 76 लाख 24 हजार 433 व कामगाराचे 20 लाख 94 हजार 500 असे 56 लाख 18 हजार 933 रुपये येणे असल्याचे सांगून प्रोजेक्ट मॅनेजर नितीनभाई याला बिल पाठवून दिले होते. यावेळी नितीनभाईने एनआरजे कन्स्ट्रक्शनकडून त्यांना लवकरच पेमेंट दिले जाईल असे सांगितले. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांचे पेमेंट केले नाही. एक वर्ष उलटूनही कंपनीने पेमेंट न दिल्याने त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत कंपनीला नोटीस पाठविली होती, मात्र या नोटीसला त्यांनी काहीच उत्तर दिले नाही.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच रमेश उकानी यांनी बोरिवली पोलिसांत एनआरजे कन्स्ट्रक्शन कंपनीसह मालक, संचालक आणि इतर पदाधिकार्यांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संबंधितांविरुद्ध भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत गेल्या चार वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या निरज वेद याला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.