बांगलादेशी नागरिकांना एक महिन्यांचा कारावासाची शिक्षा

शिक्षेनंतर नागरिकांना बांगलादेशात डिपोर्ट करण्याचे आदेश

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 जुलै 2025
मुंबई, – बांगलादेशातील गरीबीसह उपासमारीला कंटाळून सीमा ओलांडून भारतात आलेल्या आणि गेल्या काही वर्षांपासून मुंबईसह पुणे शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या सात बांगलादेशी नागरिकांना अंधेरीतील लोकल कोर्टाने दोषी ठरवून एक महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यात चार महिलांसह तीन पुरुषांचा समावेश आहे. अटकेनंतर एका महिन्यांत या सातजणांविरुद्ध आरोपपत्र सादर करुन कोर्टाने हा निकाल दिला आहे. बायजीद आयुब शेख, नसरीन बेगम,रोजीना अख्तर, काकोली अख्तर ब्रिष्टी, रोमा बेगम मोहम्मद जिलानी, पाखी बेगम मुशरफ हुसैन कोहीनूर अख्तर ऊर्फ ऑलिजा अब्दुल मोनन शेख अशी या सातजणांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबई शहरात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच 24 जून 2025 रोजी अंधेरीतील जिजामाता रोड, गुरुद्वारा मेन गेटजवळील परिसरात बायजीद शेख या बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या चौकशीत त्याचे इतर काही नातेवाईक मुंबईसह पुणे शहरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर या अधिकार्‍यांनी अंधेरीसह पुण्यातील कात्रज परिसरात इतर चार महिलांसह दोन पुरुष बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती.

तपासात ते सर्वजण बांगलादेशातील गरीबीसह उपासमारीला कंटाळून गेले होते. त्यामुळे ते टप्याटप्याने बांगलादेशातून भारतात आले होते. तेव्हापासून ते सर्वजण मुंबईसह पुणे शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास होते. मिळेल ते काम करत होते. हा प्रकार उघडकीस येताच या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर ते सर्वजण न्यायालयीन कोठडीत होते. त्यांच्याविरुद्ध दहा दिवसांत तपास पूर्ण करुन पोलिसांनी अंधेरीतील लोकल कोर्टात आरोपपत्र सादर केले होते.

या खटल्याची नियमित सुनावणी घेऊन कोर्टाने सातही बांगलादेशी नागरिकांना दोषी ठरविले होते. त्यानंतर त्यांना एक महिन्यांचा कारावास, पाचशे रुपयांचा दंड, दंडाची रक्कम न भरल्यास आणखीन दोन दिवस कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षेनंतर या सर्वांना बांगलादेशात डिपोर्ट करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे त्यांना लवकरच बांगलादेशात पाठविण्यात येणार आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीसिंग दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी, पोलीस निरीक्षक महेश गुरव, संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक यश पालवे, पोलीस उपनिरीक्षक महादेव जगताप, पोलीस हवालदार टायगर मंडले, पुजारी, प्रविण जाधव, नलावडे, पोलीस शिपाई अमोल पवार, शितल माळी, संदेश देसाई, निलेश साळुंखे, जगताप यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page