96 लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन भावाचे पलायन

गुन्हा दाखल होताच सर्व दागिन्यांसह भावाला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 जुलै 2025
मुंबई, – सुमारे 96 लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन भावानेच पलायन केल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सूर्यदेव रामसुमेर त्रिपाठी या आरोपी भावाला काही तासांत एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सर्व सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. अटकेनंतर सूर्यदेवला लोकल कोर्टाने जामिनावर सोडून दिल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत भोसले यांनी सांगितले.

कृष्णदेव रामसुमेर त्रिपाठी हे व्यावसायिक असून त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील महाकाली गुंफा रोड, तक्षीला अपार्टमेंटमध्ये राहतात. चकाला येथे त्यांची अ‍ॅपेक्स इन्फोटेक इंडिया नावाची एक खाजगी कंपनी असून कंपनी इंटरनेट मार्केटिंगचे काम करते. त्यांच्या कंपनीला इतर कंपन्याच्या प्रोडेक्टचे इंटरनेट मार्केटिंगचे काम दिले होते. या ऑर्डरच्या बदल्यात त्यांची कंपनी गुगल, मेटा अ‍ॅड्स, ईमेल आदी ठिकाणी संबंधित कंपनीची मार्केटिंग करते. याकामी त्यांना त्यांचा भाऊ सूर्यदेव त्रिपाठी हा मदत करतो. कंपनीत तो ऑपरेशन मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.

गेल्या चार ते पाच वर्षांत त्यांनी एक कोटी रुपये जमा केले होते. या पैशांतून त्यांना गोल्ड खरेदी करायचे होते. त्यामुळे त्यांनी अंधेरीतील गिरीराज इंडस्ट्रिजच्या पाटील अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्स यांना ही रक्कम दिली होती. शुक्रवारी दुपारी त्यांनी सूर्यदेव याला सोन्याचे दागिने घेऊन येण्यासाठी पाटील अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्स दुकानात पाठविले होते. यावेळी दुकानाचे स्वप्नील थोरात यांनी त्याला 98 लाख रुपयांचे एक किलो विविध सोन्याचे दागिने दिले होते. काही वेळानंतर तो तेथून निघून गेला होता. ही माहिती नंतर कृष्णदेव त्रिपाठी यांना त्यांना देण्यात आली होती. मात्र सोन्याचे दागिने घेऊन गेलेला सूर्यदेव हा कंपनीत आला नाही. तो दागिने घेऊन पळून गेला होता.

हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सूर्यदेवला कॉल केला, मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. दागिने घेऊन सूर्यदेव पळून गेल्याची खात्री होताच त्यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सूर्यदेव त्रिपाठीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

या तक्रारीची सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशाने या पथकाने काही तासांत सूर्यदेव त्रिपाठीला अटक केली. त्याच्याकडून अपहार केलेले सर्व दागिने हस्तगत केले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याची जामिनावर सुटका केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page