शेअर ट्रेडिंगद्वारे चांगल्या परताव्याच्या आमिषाने महिलेची फसवणुक
सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्या आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 जुलै 2025
मुंबई, – शेअर ट्रेडिंगद्वारे चांगल्या परताव्याच्या आमिषाने एका महिलेची सुमारे 27 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी एका 28 वर्षांच्या आरोपीस ठाण्यातून उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर विभागाने अटक केली. विनायक प्रमोदकुमार बर्नवाल असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे. त्याने दिलेल्या बँक खात्यात आतापर्यंत 106 हून फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
यातील 58 वर्षांची तक्रारदार महिला दहिसर येथे राहते. काही महिन्यांपूर्वी तिला एका अज्ञात व्यक्तीने एक मॅसेज पाठवला होता. त्यात शेअर ट्रेडिंगची जाहिरात देण्यात आली होती. शेअर ट्रेडिंगद्वारे गुंतवणुक केल्यास तिला चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. तिचा विश्वास बसावा म्हणून तिला शेअर ट्रेडिंगचे काही टिप्स आणि मार्गदर्शन करण्यात आले होते. त्यानंतर तिला एक लिंक पाठवून शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. त्यांच्या आमिषाला बळी पडून तिने विविध शेअरमध्ये 27 लाख 44 हजार 236 रुपयांची गुंतवणुक केली होती. मात्र या गुंतवणुकीवर तिला कुठलाही परतावा देण्यात आला नाही, तिची गुंतवणुक केलेली रक्कम परत करण्यात आली नाही.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने उत्तर सायबर विभागात तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला होता. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँकेची माहिती काढून पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैले बलकवडे, पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे, पोलीस निरीक्षक किरण आहेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार, पोलीस हवालदार वसईकर, नाडगौडा, परब यांनी ठाण्यातून विनायक बर्नवाल या तरुणाला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.
चौकशीत तो ठाण्यातील कशेळी, मैत्रीपार्कच्या स्वस्तिक रेसीडेन्सी अपार्टमेंटमध्ये राहत होता. तो काही सायबर ठगांच्या संपर्कात होता. फसवणुकीसाठी त्याने या सायबर ठगांना बँक खाती पुरविली होती. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा होत होती. ती रक्कम नंतर तो संबंधित सायबर ठगांना पाठवत होता. त्यासाठी त्याला ठराविक रक्कमेचे कमिशन मिळत होते. त्याच्या बँक खात्याची पडताळणी केल्यानंतर राज्यासह देशभरात संबंधित खात्यात 106 हून अधिक गुन्ह्यांतील फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.