मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 जुलै 2025
मुंबई, – विविध कोर्ससाठी घेतलेल्या 1 कोटी 55 लाखांचा अपहार करुन कोर्स अर्धवट सोडून एका खाजगी कंपनीसह विद्यार्थ्यांची फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून ते तिघेही एका खाजगी कंपनीचे संचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले. केविल रोहितभाई पटेल, संजय प्रविणभाई विरानी आणि बादल वेकारिया अशी या तिघांची नावे आहेत. ते तिघेही पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
विजय जगन्नाथ डोईफोडे हे व्यावसायिक असून त्यांची अंधेरीतील एमआयडीसी परिसरात एक खाजगी इन्स्टिट्यूट आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांची केविल पटेल, संजय विरानी आणि बादल वेकारिया यांच्याशी ओळख झाली होती. या तिघांनी गुजरातच्या सुरत शहरातील उतरण आणि सर्थणा या ठिकाणी बीआयएतंर्गत फ्रॅचायझी घेऊन विद्यार्थ्यांसाठी विविध कोर्स सुरु करण्याची ऑफर दिली होती. ही ऑफर चांगली वाटल्याने त्यांच्या कंपनीने त्यांच्याशी एक करार केला होता. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांसोबत विविध कोर्स सुरु केले होते. त्यासाठी विजय डोईफोडे यांच्या इन्स्टिट्यूटने काही विद्यार्थ्यांच्या कोर्ससाठी त्यांना 1 कोटी 55 लाख 25 हजार 780 रुपयांचे पेमेंट केले होते.
मात्र या तिघांनी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले नाही. त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी क्लासेस अर्धवट सोडून पलायन केले होते. त्यामुळे विजय डोईफोडे यांच्या कंपनीसह संंबंधित विद्यार्थ्यांचे नुकसान झाले होते. जुलै 2023 ते जुलै 2025 या कालावधीत या तिघांनी त्यांच्या इन्स्टिट्यूटसोबत फॅ्रचायझी घेऊन करार करुन 1 कोटी 55 लाखांचा परस्पर अपहार करुन फसवणुक केली होती. याबाबत या तिघांनाही संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. नंतर त्यांनी त्यांचे मोबाईल स्विच ऑफ केले होते.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच विजय डोईफोडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर केविल पटेल, संजय विरानी आणि बादल वेकारिया यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.