मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 जुलै 2025
मुंबई, – पत्नीसोबत कथित संबंधावरुन एका रिक्षा पार्किंग व्यवसाय करणार्या व्यक्तीवर त्याच्याच परिचित आरोपीने हॉकीस्टिकसह तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मालाडच्या मालवणी परिसरात घडली. या हल्ल्यात संदेश कृष्णा पाटील हा जखमी झाल्याने त्याला कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच पळून गेेल्या अक्षय जयप्रकाश पाठक या 26 वर्षाच्या आरोपीस मालवणी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना शुक्रवारी सकाळी सहा वाजता मालाड येथील मालवणीतील मजेठिया कंपाऊंडजवळील चिकूवाडीत घडली. याच परिसरात संदेश पाटील हा राहत असून त्याचा तिथेच रिक्षा पार्किंगचा व्यवसाय आहे. अक्षय पाठक हा याच परिसरात राहत असल्याने ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. शुक्रवारी संदेश हा रिक्षा पार्किंगमध्ये झोपला होता. यावेळी तिथे अक्षय आला आणि त्याने विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याच्या पत्नीसोबत कथित संबंधाचया संशयावरुन तने त्याच्या बुलेटसह स्कूटी पेटवून दिली. त्यानंतर त्याने त्याच्या बाईकवरुन आईला भेटण्याचे कारण सांगून त्याच्या घरी आणले. तिथे त्याच्यावर जिवे मारण्याच्या उद्देशाने हॉकीस्टिकसह तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या डोक्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाली होती.
या हल्ल्यानंतर अक्षय तेथून पळून गेला. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या संदेशला पोलिसांनी तातडीने शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. उपचारानंतर त्याने पोलीस ठाण्यात येऊन घडलेला प्रकार सांगून अक्षय पाठकविरुद्ध तक्रार केली होती. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच अक्षयचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला मालाड येथून पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पूर्ववैमस्नातून 33 वर्षांच्या तरुणावर हल्ला
विलेपार्ले येथील दुसर्या घटनेत पूर्ववैमस्नातून परिमल बकेश चक्रवर्ती या 33 वर्षाच्या व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी जुहू पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाच्या गुन्ह्यांत सुरज कुमार देवेंद्र या तरुणाला अटक केली. सुरज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात तीन गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. परिमल आणि सुरज हे दोघेही विलेपार्ले येथील नेहरुनगर परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित आहे. या दोघांमध्ये जुना वाद होता. याच वादातून त्यांच्यात नेहमीच शाब्दिक खटके उडत होते. शनिवारी परिमल हा त्याच्या घरी जात होात. यावेळी नेहरुनगर, अण्णाचाळ, गणेश मंदिराजवळ सुरज आला आणि त्याने जुन्या वादातून त्याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता. त्याला बघून घेण्याची धमकी देऊन तो पळून गेला होता. ही माहिती मिळताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सुरज देवेंद्रला पोलिसांनी गुन्ह्यांतील कोयत्यासह अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याच्याविरुद्ध जबरी चोरी, गंभीर दुखापतीसह जबरी चोरी, मारामारीसह शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.