बँकेने जप्त केलेले कार स्वस्तात देण्याच्या आमिषाने गंडा

कारसाठी बारा लाखांचा अपहार करुन पाचजणांची फसवणुक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 ऑगस्ट 2025
मुंबई, – बँकेने जप्त केलेले कार स्वस्तात देतो अशी बतावणी करुन पन्नास टक्के रक्कम आगाऊ घेऊन उर्वरित रक्कमेचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने पाचजणांना गंडा घालणयात आल्याचा प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी गिरीधर विठ्ठल पाटील या मुख्य आरोपीविरुद्ध नेहरुनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. गिरीधरने कारसाठी तक्रारदारासह पाचजणांकडून बारा लाख रुपये घेऊन पलायन केले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मूळचे झारखंडचे रहिवाशी असलेले अजीतकुमार अशोक साव हे चालक असून चेंबूर परिसरात राहतात. त्यांच्यासह त्यांचा भाऊ ओलाचालक तर वडिल रिक्षाचालक म्हणून काम करतात. एप्रिल महिन्यांत त्यांच्या एका मित्राने कर्जाचे हप्ते न भरल्याने बँकेने काही कार जप्त केले आहेत. त्यातील एक कार त्याला स्वस्तात देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा मित्र गिरीधर पाटील याने आतापर्यंत अनेकांना बँकेने जप्त केलेले कार स्वस्तात मिळवून दिले आहेत असे सांगितले होते. त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी कारची गरज होती. त्यामुळे त्यांनी बँकेने जप्त केलेली कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ते त्यांच्या मित्रासोबत गिरीधरच्या पनवेल येथील श्रीराम फायनान्स सर्व्हिस या कार्यालयात गेले होते. तिथेच त्यांच्यात कारबाबत सविस्तर चर्चा झाली होती. त्याने त्यांना एका स्फ्टि डिझायर कार दाखविली होती. सुरुवातीला अर्धी रक्कम भरुन बँकेतून उर्वरित रक्कमेचे कर्ज देण्याचे गिरीधरने त्यांना सांगितले होते.

काही दिवसांनी कारची किंमत साडेचार लाख रुपये असून त्यांना चार लाखांमध्ये ही कार देतो असे सांगितले. त्यामुळे त्यांनी कार खरेदी करण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याला 2 लाख 27 हजार रुपयांचे पेमेेंट केले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना कारचा ताबा दिला नाही. त्याला संपर्क साधल्यानंतर त्याचा मोबाईल बंद येत होता. चौकशीदरम्यान गिरीधर पाटील याने त्यांच्यासह इतरांना अशाच प्रकारे बँकेने जप्त केलेले कार स्वस्तात देतो असे सांगून गंडा घातल्याचे समजले.

अशा प्रकारे गिरीधरने त्यांच्याकडून 2 लाख 27 हजार, अभिषेककुमार चौरसियाकडून 2 लाख 36 हजार, उमेश गंधारी गुप्ताकडून 2 लाख 24 हजार, महेश श्रीरंग साळुंखेकडून 3 लाख 2 हजार आणि किशोर सुरेश टिकेकडून दोन लाख असे एकूण सुमारे बारा लाख रुपये घेतले होते. मात्र कोणालाही बँकेतून कर्ज दिले नाही, कारचा ताबा दिला नाही. कारसाठी आगाऊ घेतलेल्या पैशांचा परस्पर अपहार करुन पाचजणांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच अजीतकुमार साव यांनी नेहरुनगर पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्याप्रकरणी गिरीधर पाटील याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गिरीधर पाटील हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page