छातीत दुखू लागल्याने माजी नगरसेवक हॉस्पिटलमध्ये दाखल
खंडणीचा तिसरा हप्ता घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर प्रकृती बिघडली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 ऑगस्ट 2025
मुंबई, – अनधिकृत बांधकाम करत असल्याचा आरोप करुन 35 लाखांची खंडणीची मागणी करुन खंडणीचा पाच लाखांचा हप्ता घेताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा माजी नगरसेवक कमलेश केदारनाथ राय याला शुक्रवारी रात्री उशिरा एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर वैद्यकीय तपासणीनंतर नेल्यानंतर कमलेश राय याच्या छातीत अचानक दुखू लागले, त्यामुळे त्याला उपचारासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळताच त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कमलेश रायने यापूर्वी आठ लाखांचा हप्ता घेतला असून तिसरा हप्ता घेताना त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
मुख्यतार ऊर्फ पप्पूभाई ऊर्फ अब्दुल सत्तार शेख हे खाजगी कॉन्ट्रक्टर असून ते सध्या अंधेरीतील मरोळ, कनाकिया सेव्हन्स परिसरात राहतात. त्यांच्या कंपनीचे अंधेरी परिसरात एक प्रोजेक्ट सुरु आहे. या ठिकाणी सुरु असलेले बांधकाम अवैध आणि अनधिकृत असल्याचा आरोप करुन ते बांधकाम थांबविण्याची धमकीच माजी नगरसेवक कमलेश राय याने दिली होती. ते बांधकाम सुरळीत सुरु ठेवण्यासाठी त्याने तक्रारदार अब्दुल शेख यांच्याकडे 35 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली हेती. खंडणीची ही रक्कम दिली नाही बांधकामावर कारवाई करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी कमलेश रायला 3 जुलैला तीन लाख रुपयांचा खंडणीचा पहिला हप्ता दिला होता. त्यानंतर त्यांनी 30 जुलैला दुसरा हप्ता देण्यास सांगितले होते.
ठरल्याप्रमाणे अब्दुल शेख यांनी पाच लाख रुपये देण्याची तयारी दर्शवून कमलेश राय याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर घेतली होती. ठरल्याप्रमाणे कमलेश राय हा पाच लाखांचा खंडणीचा दुसरा हप्ता घेण्यासाठी अंधेरीतील मरोळ, मिलिटरी रोडच्या प्राईम अॅकडमी स्कूलजवळील हॉटेल गोल्डन टुलीप्समध्ये आले होते. यावेळी खंडणीचा हप्ता घेताना त्याला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. या कारवाईनंतर अब्दुल शेख यांच्या तक्रारीवरुन कमलेश राय याच्याविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक आयफोन, दहा हजाराची कॅश आणि एक पेनड्राईव्ह असा एक लाख पाच हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटकेनंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे त्याच्या छातीत अचानक दुखू लागले होते. त्यामुळे तपासणीनंतर त्याला डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेतले आहे. त्यामुळे कमलेशला शनिवारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले नव्हते. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच त्याच्यावर आता पुढील कारवाई होणार आहे. कमलेश हा शिवसेनेचे माजी नगरसेवक आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर तो एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला होता. त्याने त्यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला होता. कमलेशला खंडणीच्या गुन्ह्यांत अटक झाल्याने त्याच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.