शंभर मिलियन बक्षिसाचे गाजर दाखवून वयोवृद्ध महिलेची फसवणुक
21 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 ऑगस्ट 2025
मुंबई, – पझल गेम खेळल्यामुळे तुम्हाला शंभर मिलियनचे बक्षिस लागल्याचे गाजर दाखवून एका वयोवृद्ध महिलेची अज्ञात सायबर ठगाने सुमारे 21 लाखांची फसवणुक केली. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध उत्तर प्रादेशिक सायबर सेलने फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. बक्षिसाची रक्कम थेट बँकेत जमा होईल असे सांगून या ठगाने प्रोसेसिंग फीसह इतर कारणासाठी पैशांची मागणी करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
79 वर्षांची कृपा रुपानारायण भट ही महिला कांदिवलीतील चारकोप परिसरात राहते. तिचे गोरेगाव येथे एक फ्लॅट असून या इमारतीचे पुर्नविकासाचे काम सुरु असल्याने ती सध्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहते. एप्रिल 2025 रोजी ती फेसबुक पाहत होती. त्यात एक गेम खेळण्याचा पेज ओपन झाले. त्यात काही प्रश्न विचारण्यात आले होते, त्याचे उत्तर येत असल्याने तिने सर्व प्रश्नाची उत्तरे दिले होते. तनंतर तिला एका अज्ञात व्यक्तीने तिला शंभर मिलियनचे बक्षिस मिळणार असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या मुलगा आजारी असून त्याचया रिहॅब सेंटरमध्ये उपचार सुरु आहे. त्यासाठी तिला पैशांची गरज होती. त्यातच तिला शंभर मिलियन मिळणार असल्याने तिने पुढे पझल गेम खेळण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे या व्यक्तीने तिला एक लिंक पाठविली होती.
ती लिंक ओपन करुन तिने साईन अप करण्याचा प्रयत्न केला, मात्र बरेच प्रयत्न करुनही तिला साईन अप करता आले नाही. त्यानंतर त्याने तिला मदत करण्याचे आश्वासन देत तिला बक्षिसाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी काही प्रोसेस करावे लागतील असे सांगितले. त्यामुळे तिने प्रोसेसह इतर कारणासाठी त्याने दिलेल्या बँक खात्यात काही रक्कम ट्रान्स्फर केली होती. 28 एप्रिल ते 21 जुलै 2025 या कालावधीत तिने वेगवेगळ्या बँक खात्यात 21 लाख 23 हजार 700 रुपये जमा केले होते. मात्र ही रक्कम जमा करुनही तिच्या खात्यात शंभर मिलियन जमा झाले नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने तिला शेवटची एक रक्कम जमा करण्यास सांगून नंतर बक्षिसाची रक्कम जमा होईल असे सांगितले. संबंधित व्यक्ती प्रत्येक वेळेस शेवटी रक्कम भरा असे सांगत होता.
24 जुलैला त्याने तिला मॅसेज करुन संबंधित अॅप बंद झाले आहे, त्यामुळे तिला काहीच रक्कम मिळणार नाही असा मॅसेज पाठविला होता. त्यामुळे तिने हा प्रकार तिच्या मैत्रिणीला सांगितला. यावेळी तिने तिची अज्ञात सायबर ठगाकडून फसवणुक होत असल्याचे त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने सायबर पोर्टलसह उत्तर प्रादेशिक सायबर सेल विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. ज्या बँक खात्यात तिने ही रक्कम ट्रान्स्फर केली आहे, त्या बँक खात्याची माहिती काढून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.