साडेचौदा कोटीच्या हायड्रोपोनिक गांजासह प्रवाशाला अटक
आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकार्यांची कारवाई
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 ऑगस्ट 2025
मुंबई, – साडेचौदा कोटीच्या हायड्रोपोनिक गांजासह एका प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकार्यांनी अटक केली. त्याच्या बॅगेतून या अधिकार्यांनी 14 किलो 548 ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला आहे. बँकाँकहून तो गांजा घेऊन आल्यानंतर त्याच्यावर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करण्यात आली आहे.
3 ऑगस्टला बँकाँकहून आलेल्या एका प्रवाशाला आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून या अधिकार्यांनी पाच किलो हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला होता. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत पाच कोटी रुपये इतकी किंमत होती. ही कारवाई ताजी असताना मंगळवारी 5 ऑगस्टला बँकॉकहून पुन्हा हायड्रोपोनिक गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती कस्टम अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी बँकाँकहून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची तपासणी सुरु केली होती.
मंगळवारी रात्री उशिरा आरोपी प्रवाशी बँकॉकहून आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. विमानतळाबाहेर जाण्यापूर्वीच त्याला कस्टम अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी त्याच्या सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात कस्टम अधिकार्यांना 14 किलो 548 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा सापडला. या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 14 कोटी 54 लाख 80 हजार रुपये इतकी किंमत आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदवून नंतर त्याला या अधिकार्यांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गेल्या काही वर्षांत विदेशातून गोल्ड आणि ड्रग्ज तस्करीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्यानंतर कस्टम अधिकार्यांनी अशा तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या चार दिवसांत दोन प्रवाशांना अटक करुन या अधिकार्यांनी त्यांच्याकडून 19 किलो 575 ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत 19 कोटी 57 लाख 50 हजार रुपये सांगण्यात आले.