डिजीटल अरेस्टची भीती दाखवून वयोवृद्ध महिलेला गंडा

वॉण्टेड असलेल्या सायबर ठगाला दिल्लीतून अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 ऑगस्ट 2025
मुंबई, – मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत डिजीटलची अरेस्टची भीती दाखवून एका वयोवृद्ध महिलेची सुमारे 78 लाख रुपयांची फसवणुक केल्याच्या कटातील एका वॉण्टेड आरोपी आठ महिन्यानंतर दिल्ली येथून उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. मुकेशकुमार सिमला असे या आरोपीचे नाव असून याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मुकेशकुमारविरुद्ध मुंबईसह दिल्लीतील विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल असून त्याच्यावर सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे. याच बँकेत विविध गुन्ह्यांतील कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

67 वर्षांची तक्रारदार महिला बोरिवली परिसरात राहत असून 2018 रोजी ती शासकीय कंपनीतून निवृत्त झाली आहे. 9 ऑक्टोंबर 2024 रोजी तिला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो नोटीफिकेशन डिपार्टमेंट ऑफ मुंबई हायकोर्टातून अजयकुमार बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्याविरुद्ध कोर्टाची अरेस्ट ऑर्डर निघाली आहे. त्यामुळे त्यांना बंगलोर पोलिसांकडे चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे असे सांगितले. यावेळी तिने तिच्याविरुद्ध कोणी आणि कुठली केस दाखल केली आहे याबाबत विचारणा केली. यावेळी त्याने त्यांच्या आधारकार्डचा वापर करुन बंगलोर येथील एका बँकेत खाते उघडण्यात आले असून बँकेच्या क्रेडिट कार्डवरुन पावणेतीन लाखांचे व्यवहार झाले आहे. ही रक्कम तिला बँकेला देणे आहे. त्यानंतर त्याने बंगलोर पोलिसांशी तिचा फोन कनेक्ट करुन दिला. यावेळी तिच्याशी विनयकुमार चौबे आणि दिपाली मासीरकर या तोतया पोलिसांशी संभाषण केले होते. त्यांनी तिला नरेश गोयल याच्याविषयी माहिती सांगून त्याला मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत अटक झाली आहे. त्याच्या राहत्या घरी पोलिसांना 247 क्रेडिट कार्ड सापडले असून त्यातील एक कार्ड त्यांच्या नावाचे आहे. त्यात दोन कोटीचे मनी लॉड्रिंग झाले आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर तिला अटक होईल आणि नंतर शिक्षा होईल अशी भीती दाखविण्यात आली होती.

यावेळी तिने ती नरेश गोयल नावाच्या कुठल्याही व्यक्तीला ओळखत नाही. तिचे अन्य कुठल्या बँकेत खाते नसून तिच्या आधारकार्डचा दुसर्‍या व्यक्तीने गैरवापर केला असावा असे सांगितले. मात्र या दोघांनी तिला चौकशीसाठी बंगलोरला यावेच लागेल असे सांगितले. मात्र तिने तिच्यावर कॅन्सरवर उपचार सुरु असल्याने तिथे येण्यास नकार दिला. यावेळी त्यांनी तिची ऑनलाईन चौकशी सुरु केली. तिच्या बँक खातयाची माहितीसह इतर माहिती काढण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर तिला रिझर्व्ह बँकेचा आणि सत्यमेव जयतेचा लोगो असलेले बोगस लेटर पाठवून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. चौकशी सुरु असेपर्यंत तिला कोणालाशी भेटता येणार नाही, त्यांच्याशी बोलता येणार नाही असे सांगून त्या सध्या डिजीटल अरेस्ट असल्याचे सांगितले.

चौकशी पूर्ण होईपर्यंत तिला एका बँक खात्यात तिच्या बँक खात्यातील रक्कम ट्रान्स्फर करण्यास सांगण्यात आले. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तिने दिलेल्या बँक खात्यात 78 लाख 70 हजार रुपये जमा केले होते. ही रक्कम तिला चौकशी पूर्ण झाल्यानंतर परत केली जाईल असे सांगण्यात आले. मात्र नंतर तिची चौकशी झाली नाही किंवा त्यांनी तिचे पैसे तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले नाही. हा प्रकार नंतर तिने तिच्या मुलाला सांगितली. यावेळी त्याने तिची अज्ञात सायबर ठगाकडून फसवणुक झाल्याचे सांगून तिला पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले. त्यानंतर तिने सायबर हेल्पलाईनसह सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तोतयागिरी करुन ऑनलाईन फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना पोलिसांनी मुकेशकुमार सिमला याला दिल्लीतून अटक केली.

चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. काही रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्याने ही रक्कम नंतर संंबंधित सायबर ठगांना दिली होती. सायबर ठगासाठी त्याने विविध बँकेत खाती उघडून दिले होते. या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा होत होती. त्याच्या बँक खात्याचा इतरही फसवणुकीच्या गुन्ह्यांत वापर झाला होता. मुंबईसह दिल्लीत त्याच्याविरुद्ध अशाच फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्याला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page