एमआयडीसीच्या परिक्षेत विद्यार्थ्याकडून कॉपी करण्याचा प्रयत्न
शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 ऑगस्ट 2025
मुंबई, – महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या (एमआयडीसी) परिक्षेत परिक्षा केंद्रात मोबाईल आणून पीसीचे सतराहून फोटो काढून एका विद्यार्थ्याने कॉपी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शुभम गजानन पाटील या 28 वर्षांच्या विद्यार्थ्याविरुद्ध पवई पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याविरुद्ध शासनाची दिशाभूल करुन अन्य विद्याार्थ्याचे नुकसान होईल असे कृत्य केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
सोनल सुहास मसुरकर ही महिला घाटकोपरच्या भटवाडी येथे राहते. शनिवार 9 ऑगस्टला पवईतील ओरम आयटी पार्क येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाची परिक्षा आयोजित करण्यात आली होती. त्यात ती सुपरवायझर म्हणून काम पाहत होती. परिक्षा सुरळीत पार पडावी यासाठी तिच्यासह इतर पर्यवेक्षकाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत होती. यावेळी तिथे धिरज राजेंद्रप्रसाद प्रजापती आणि आशिश बेनबन्सीहे व्हेन्यू कमांडिंग ऑफिसर म्हणून काम पाहत होते. परिक्षेसाठी लॅब तीसमध्ये अठरा विद्यार्थी हजर होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर मोबाईलसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास मनाई करणयात आली होती.
मात्र परिक्षा सुरु असताना शुभम पाटील या विद्यार्थी प्रचंड घाबरला आणि गोंधळलेला दिसून आला. त्यामुळे त्याची चौकशी करुन अंगझडतीसाठी त्याला बाथरुममध्ये नेण्यात आले. मात्र त्याच्या अंगझडतीत त्यांना काहीच सापडले नाही. काही वेळानंतर बाथरुमच्या कचराकुंडीत सुरक्षारक्षकाला एक मोबाईल सापडला. या मोबाईलची पाहणी केल्यानंतर त्यात पीसीचे सतरा फोटो सापडले. हा मोबाईल शुभमचा होता. हा कॉपीचा प्रकार असल्याचे उघडकीस येताच ही माहिती नंतर पवई पोलिसांना देण्यात आली.
चौकशीदरम्यान त्याने परिक्षा केंद्रात मोबाईल आणून कॉपी करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे सोनल मसुरकर हिच्या तक्रारीवरुन त्याच्याविरुद्ध पोलिसांनी भारती न्यास सहिता आणि महाराष्ट्र विद्यापिठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परिक्षांमध्ये होणार्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांचा पवई पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.