मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 ऑगस्ट 2025
मुंबई, – मंत्रालयात उपसचिवाचा पीएस तसेच शिक्षण विभागात कक्ष अधिकारी असल्याची बतावणी करुन एका किराणा मालाच्या व्यापार्याची टेंडरसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी तोतया मंत्रालयीन अधिकार्याला गावदेवी पोलिसांनी अटक केली. प्रविण तानाजी राडे असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा सांगलीचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी व्हीव्हीआयपीसाठी वापरण्यात येणारे लुमेक्स कंपनीचा नारंगी दिवा, एक मोबाईल जप्त केला आहे. प्रविण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मुंबईसह सातारा, यवतमाळ शहरात अशाच काही फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
नरेंद्रकुमार नागभूषण मंचीकांती हे माटुंगा येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचा गावदेवीतील जसलोक हॉस्पिटलजवळील न्यू पौर्णिमा अपार्टमेंटमध्ये किराणा मालाचे एक दुकान आहे. याच दुकानात प्रविण हा नियमित येत असल्याने त्यांची चांगली ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान प्रविणने तो मंत्रालयात उपसचिवाचा पीए असल्याची बतावणी केली होती. त्याच्याकडे एक इनोव्हा कार होती, या कारवर तो अंबर दिवा लावत होता. त्याला ती कार उपसचिवाकडून देण्यात आल्याचे सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. 2 मे 2024 रोजी तो त्यांच्या दुकानात आला होता. त्याला एक टेंडर भरण्यासाठी तातडीने दहा लाखांची गरज आहे. त्यात त्याला प्रचंड फायदा होणार असून त्यातील काही रक्कम तो त्यांना देईल असे सांगून त्याने त्यांच्याकडे दहा लाखांची मागणी केली होती. तो मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला पाच लाख रुपये ऑनलाईन पाठविले तर पाच लाख रुपयांचा धनादेश दिला होता.
काही दिवसांनी त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. यावेळी त्याने त्यांना साडेतीन लाख रुपये परत केले. मात्र उर्वरित साडेसहा लाख रुपये देण्यासाठी तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. ऑक्टोंबर 2024 ते त्याच्या घरी गेले होते, मात्र तो घरी नव्हता. त्याचा मोबाईल बंद येत होता. डिसेंबर महिन्यांत त्याने त्यांना मॅसेज करुन तो हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे, डिस्चार्ज मिळताच तो त्यांना उर्वरित पैसे देईल असे सांगितले. मात्र त्याने त्यांना पैसे दिले नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच नरेंद्रकुमार हे मंत्रालयात शहानिशा करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना प्रविण राडे नावाचा कोणीही व्यक्ती उपसचिवाकडे कामाला किंवा मंत्रालयाच कामाला नसल्याचे समजले.
अशा प्रकारे प्रविणने तो मंत्रालयात कामाला असल्याची बतावणी करुन टेंडरसाठी दहा लाख रुपये घेऊन त्यांना त्यातून चांगला परतावा देतो असे सांगून त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी गावदेवी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर प्रविण राडेविरुद्ध पोलिसांनी तोतयागिरी करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशांनतर पोलिसांनी प्रविणला त्याच्या गावदेवी येथील राहत्या घरातून अटक केली.
चौकशीत प्रविण हा गावदेवी येथील पेडर रोड, जसलोक हॉस्पिटल, न्यू पौर्णिमा अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक ए/202 मध्ये राहत असून मूळचा सांगलीच्या अमानपूर, पलुसचा रहिवाशी आहे. त्याने इनोव्हा कार 90 हजाराच्या भाड्याने घेतली होती. या कारवर अंबर दिवा लावून तो अनेकांना उपसचिवाकडे पीएस, शिक्षण विभागात कक्ष अधिकारी असल्याची बतावणी करत होता. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध सातारा येथील पुसेगाव, यवतमाळ येथील दिग्रस आणि मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्यात अपहारासह फसवणुकीच्या तीन गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या अटकेने फसवणुकीच्या अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.