बँकाँकहून आणलेल्या हायड्रोपोनिक गांजासह दोन प्रवाशांना अटक
दोन्ही प्रवाशांकडून सव्वापाच कोटीचा गांजाचा साठा जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 ऑगस्ट 2025
मुंबई, – गेल्या आठवड्यात बँकाँकहून आणलेल्या सुमारे 19 कोटीच्या हायड्रोेपोनिक गांजासह प्रवाशांना अटकेची घटना ताजी असताना शनिवारी पुन्हा दोन प्रवाशांना हायड्रोपोनिक गांजासह छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाने अटक केली. हार्दिक प्रगिजाभाई भदानी आणि मोहम्मद समी अशी या दोघांची नावे असून ते दोघेही गुजरात आणि दिल्लीचे रहिवाशी आहे. या दोघांकडून या अधिकार्यांनी 5 किलो 212 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला असून त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत पाच कोटी एकवीस लाख वीस हजार रुपये इतकी आहे. एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई केल्यानंतर या दोघांनाही रविवारी दुपारी किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही दिवसांत बँकाँकहून हायड्रोपोनिक गांजा तस्करीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे बँकॉकहून येणार्या प्रत्येक प्रवाशांसह त्यांच्या बॅगेची तपासणी हवाई गुप्तचर विभागाने सुरु केली होती. ही तपासणी सुरु असताना गेल्या आठवड्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत या अधिकार्यांनी दोन प्रवाशांना अटक केली होती. त्यापैकी एका प्रवाशाकडून 19 किलो 548 तर दुसर्या प्रवाशाकडून 5 किलो 027 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला होता. त्याची किंमत 19 कोटी 57 लाख 50 हजार रुपये इतकी होती.
ही कारवाई ताजी असताना शनिवारी रात्री उशिरा बँकाँकहून पुन्हा हायड्रोपोनिक गांजाची तस्करी होणर असल्याची माहिती या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी बँकॉकहून आलेल्या दिल्लीचा रहिवाशी मोहम्मद समी आणि गुजरातचा रहिवाशी हार्दिक भदानी या दोन प्रवाशांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या दोघांच्या बॅगेतून या अधिकार्यांनी सुमारे सव्वापाच कोटी रुपयांच्या हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला आहे.
त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन नंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. गांजा तस्करीसाठी या दोघांनाही विमान तिकिटासह ठराविक रक्कम कमिशन म्हणून देण्यात आले होते. रविवारी दुपारी या दोघांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.