मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 ऑगस्ट 2025
मुंबई, – म्हाडा फ्लॅटचे बोगस ताबा पत्र देऊन कमिशन म्हणून घेतलेल्या सुमारे सव्वाआठ लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी बेला मॅलवीन डिसुझा या 50 वर्षांच्या महिलेस समतानगर पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत आश्विन कारवा आणि केदार सुधाकर साटम हे दोघेही सहआरोपी आहेत. गुन्ह्यांत या दोघांनाही मदत केल्याचा बेलावर आरोप असून याच गुन्ह्यांत ती सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मयुर विनयकुमार अग्रवाल हे व्यावसायिक असून त्यांच्या कुटुंबियांसोबत कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज परिसरात राहतात. तीन वर्षांपूर्वी त्यांचा भाऊ भाविनने आश्विन कारवा व त्याचा मेहुणा केदार साटम याच्याशी त्यांची ओळख करुन दिली होती. या दोघांची म्हाडामध्ये चांगली ओळख असून ते म्हाडाचे फ्लॅट स्वस्तात मिळवून देतात असे सांगितले. म्हाडा फ्लॅटची सविस्तर प्रोसेसिंग सांगून त्यांनी त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. अग्रवाल बंधूंना फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती, त्यामुळे त्यांनी त्यांना म्हाडाचा एक फ्लॅट स्वस्तात मिळवून देण्याची विनंती केली होती. इतकेच नव्हे तर त्यांना कांदिवली किंवा मालाड येथे 1300 चौ. फुटाचा फ्लॅट एक कोटी चाळीस लाखांना देण्याचे आमिष दाखविले होते. या कामासाठी त्यांचे कमिशन बारा लाख रुपये असेल असेही सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांना सहा लाख रुपये आगाऊ दिले होते.
काही दिवसांनी त्यांनी त्यांना एका इमारतीच्या बांधकाम साईटवर आणले. तिथे गेल्यानंतर त्यांना इमारतीचे बांधकाम सुरु असल्याचे दिसून आले. इमारतीचे बांधकाम लवकरच पूर्ण होईल, त्यानंतर त्यांना तिथे फ्लॅट देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. काही दिवसांनी त्यांनी त्यांच्याकडून आणखीन दोन लाख अठरा हजार रुपये घेतले होते. मार्च 2020 रोजी त्यांनी त्यांना म्हाडाकडून त्यांना एक फ्लॅट अलोट झाल्याचे पत्र दिले होते. या पत्रात त्यांना मालाडच्या राणी सती रोडवरील कनकिया लेवल्स इमारतीच्या सी विंग, फ्लॅट 3204 फ्लॅटचा उल्लेख होता. याच दरम्यान कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते.
दोन वर्षानंतर सर्व सुरळीत झाल्यानंतर त्यांनी म्हाडा फ्लॅटविषयी विचारणा सुरु केली होती. मात्र त्यांच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी कनकिया लेवल्स इमारतीमध्ये जाऊन केली असता एका फ्लॅटमध्ये इंटेरियरचे काम सुरु होते तर दुसर्या रुममध्ये दुसरेच कुटुबिय राहत असल्याचे दिसून आले. चौकशीदरम्यान त्यांना तिथे कुठलाही फ्लॅट अलोट झाला नसल्याचे निदर्शनास आले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आश्विन कारवा आणि केदार साटम यांच्याविरुद्ध समतानगर पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी या दोघांविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून म्हाडा फ्लॅटसाठी घेतलेल्या सव्वाआठ लाखांच्या कमिशनचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपासादरम्यान बेला डिसुझा या महिलेचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे तिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. याच गुन्ह्यांत बेला हिला तीन वर्षांनी पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस कोठडीनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.