मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 ऑगस्ट 2025
मुंबई, – दुप्पट रक्कमेच्या आमिषाने एका डिझायनर महिलेची दहा लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या वॉण्टेड आरोपीस बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. विकास शिंदे ऊर्फ विनोद किसन वाघमारे असे या 38 वर्षीय आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. गुन्हा दाखल होताच विकास हा फरार होता, अखेर त्याला पाच महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
53 वर्षांची तक्रारदार महिला रेश्मा असरार खान ही डिझायनर असून जोगेश्वरीतील ओशिवरा परिसरात राहते. राजू कनोजिया हा तिच्या परिचित असून गेल्या पाच वर्षांपासून ती त्याला ओळखते. काही महिन्यांपूर्वी त्याने तिला नोटांचे सिरीज बदल करायचे आहे असे सांगून तिला पन्नास लाखांच्या मोबदल्यात एक कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मार्च 2025 रोजी राजूने तिची ओळख त्याचा भाऊ बनारसी कनोजिया आणि मित्र विकास शिंदे याच्यासोबत करुन दिली होती. तेच तिला गुंतवणुक रक्कमेवर दुप्पट रक्कम देईल असे सांगितले. यावेळी या दोघांनी नोटांचे सिरीज बदलून दुप्पट रक्कम देत असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिने नोटांचे सिरीज बदलण्यासाठी त्यांना दहा लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती.
ठरल्याप्रमाणे 13 मार्चला ती मालाडच्या बॅक रोड, माईंड स्पेंसजवळ आली होती. तिथे तिला राजू, बनारसी, विकास व एक महिला भेटले. त्यांच्यावर विश्वास ठेवून तिने त्यांना दहा लाख रुपये दिले. ही रक्कम घेऊन त्यांचे दोन सहकारी निघून गेले. त्यानंतर त्यांनी वीस लाख रुपये घेऊन संबंधित व्यक्ती येतील असे सांगितले. मात्र याच दरम्यान त्यांनी तिथे पोलीस आले आहे, येथून पळून जा असे सांगून पलायन केले. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने त्यांना संपर्क साधला. मात्र त्यांचे मोबाईल बंद येत होते. दुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून या चौघांनी तिची फसवणुक केली होती.
त्यामुळे तिने घडलेला प्रकार बांगुरनगर पोलिसांना सांगून विकास शिंदे, राजू कनोजिया, बनारसी कनोजियासह अन्य एका महिलेविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या पाच महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या विकास शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने इतर आरोपींच्या मदतीने ही फसवणुक केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.