मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 ऑगस्ट 2025
मुंबई, – विक्रोळी येथे भरवेगात जाणार्या कार रस्त्याच्या कडेला हलगर्जीपणाने पार्क केलेल्या क्रेनला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सुल्ताना किशोर अहमद हजारिका या 77 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला. या अपघातात डोनी झियाउद्दीन हजारिका या व्यावसायिकासह त्यांची केअरटेकर महिला कादरन निसा असे दोनजण जखमी झाले. या दोघांवर विक्रोळीतील फोर्टीज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. हलगर्जीपणाने कार चालवून क्रेनला धडक देऊन एका वयोवृद्ध महिलेच्या मृत्यूस तर इतर दोघांन गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारसह क्रेनचालकाविरुद्ध विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजता विक्रोळीतील बिंदू महादेव ठाकरे ते जेव्हीएलआर सिग्नलदरम्यान झाला. डोनी हजारीका हे ठाण्यातील कासारवडवली, घोडबंदर रोड परिसरात राहतात. त्यांच्या मालकीचा गोरेगाव येथे एक संगीत स्टुडिओ आहे. त्यांची आई 77 वर्षांच्या वयोवृद्ध असल्याने विरंगुळा म्हणून ते नेहमी त्यांच्या आईला संगीत स्टुडिओमध्ये घेऊन जात होते. गुरुवारी रात्री दहा वाजता ते त्यांची आई सुल्ताना आणि तिची केअरटेकर कादरन निसा यांच्यासोबत त्यांच्या संगीत स्टुडिओमध्ये गेले होते. तिथे काही वेळ थांबल्यानंतर रात्री पावणेदोन वाजता ते गोरेगाव येथून त्यांच्या ठाण्यातील घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांनी एक कार बुक केली होती.
ही कार रात्री अडीच वाजता बिंदू महादेव ठाकरे ते जेव्हीएलआर सिग्नलदरम्यान जात असताना कारचालकाचा ताबा सुटला आणि त्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या पार्क केलेल्या क्रेनला जोरात धडक दिली होती. या अपघातात कारमधील चौघेही जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्यांना तातडीने स्थानिक लोकांनी पोलिसांच्या मदतीने जवळच्या फोर्टीज हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे सुल्ताना हजारिका यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर डोनी हजारिका आणि त्यांची केअरटेकर कादरन निसा यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते.
अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी डोनी हजारिका यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी कारचालकासह रस्त्याच्या कडेला निष्काळजीपणाने क्रेन उभा केल्याप्रकरणी क्रेनचालक अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांत अद्याप कोणालाही अटक झाली नसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.