रुम पाहण्याचा बहाणा करुन वयोवृद्धाला कोंडून दिड कोटीची लुटमार

पुरुषाचे रुप धारण करुन लुटमार करणार्‍या महिलेस अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 ऑगस्ट 2025
वसई, – रुम पाहण्याचा बहाणा करुन घरात घुसून एका 66 वर्षांच्या महिलेस घरात कोंडून सुमारे दिड कोटीचा मुद्देमाल चोरी करुन पळून गेलेल्या महिलेला पकडण्यात मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. ज्योती मोहन भानुशाली असे या 27 वर्षीय महिलेचे नाव असून तिच्याकडून पोलिसांनी चोरीचा दिड कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ज्योती ही तक्रारदार वयोवृद्धाच्या सूनेची सख्खी बहिण असून पोलिसांनी अटक करु नये म्हणून तिने पुरुषाचे रुप धारण करुन ही लुटमार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

ओधवजी खिमजी भानुशाली हे 66 वर्षांचे वयोवृद्ध माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. 11 ऑगस्टला दुपारी दिड वाजता ते त्यांच्या घरी एकटेच होते. यावेळी त्यांच्या घरी एक पुरुष आला होता. त्याने त्यांचा रुम पाहण्याचा बहाणा करुन आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बाथरुममध्ये जाण्याचा बहाणा करुन त्याने ओधवजी भानुशाली यांना कोंडून ठेवले होते. या घटनेनंतर त्याने त्यांच्या घरातील कोट्यवधी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आदी मुद्देमाल घेऊन पलायन केले होते. हा प्रकार समजताच माणिकपूर पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना संमातर तपासाचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील 75 ते 80 हून अधिक सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. त्यातील एका फुटेजमध्ये संबंधित व्यक्तीने चोरीचा माल एका ठिकाणी लपवून ठेवला होता. त्यानंतर तेथून एक महिला आणि तिने तो माल घेऊन तेथून पलायन केले होते. त्यानंतर पुरुष चोर कुठेच दिसून आला नाही. त्यामुळे या चोरीच्या गुन्ह्यांत महिलेचाही सहभाग उघडकीस आला होता. या माहितीनंतर पोलिसांनी त्या महिलेचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन गुन्हे शाखेचे एक विशेष पथक गुजरातच्या नवसारीला गेले होते. या पथकाने गणदेवी पोलिसांच्या मदतीने ज्योती भानुशाली या महिलेस चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत ज्योती ही ओधवजी भानुशाली यांच्या सूनेची सख्खी बहिण असल्याचे उघडकीस आले. तिनेच पुरुषाचे रुप धारण करुन त्यांच्या घरी लुटमार केल्याचे उघडकीस आले. बहिणीचे वयोवृद्ध सासरे घरी एकटेच राहतात, त्यामुळे तिने तिची ओळख पटणार नाही याची पुरेपुरे काळजी घेत पुरुषाचे रुप घेऊन त्यांच्या घरी प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना बाथरुममधून कोंडून तिने त्यांच्या घरातील कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते.

तिच्या राहत्या घरातून पोलिसांनी 1490 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने, 2320 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा 1 कोटी 50 लाख 84 हजार रुपयांचा संपूर्ण चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर तिला पुढील चौकशीसाठी वसई येथे आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त निकेश कौशिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त संदीप संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, संतोष मदने, मनोहर तावरे, आसिफ मुल्ला, पोलीस हवालदार प्रविणराज पवार, समीर यादव, शिवाजी पाटील धनंजय चौधरी, गोविंद केंद्रे, रविंद्र भालेराव, विकास राजपूत, रविंद्र कांबळे, हनुमंत सूर्यवंशी, विजय गायकवाड, पोलीस अंमलदार नितीन राठोड, अंगद मुळे, मसुब सचिन चौधरी, सायबर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण यांनी केले. गुन्हा घडल्यानंतर कुठलाही पुरावा नसताना या पथकाने काही तासांत या गुन्ह्यांचा पर्दाफाश करुन आरोपी महिलेस चोरीच्या सर्व मुद्देमालासह शिताफीने अटक केली. त्यामुळे या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी कौतुक केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page