खर्या नोटा घेऊन भारतीय बच्चो का बँकेच्या नोटा देऊन फसवणुक
चारजणांच्या टोळीला बोगस नोटासह गुन्हे शाखेकडून अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 ऑगस्ट 2025
मुंबई, – खर्या नोटांच्या बदल्यात दुप्पट तिप्पट नोटा देतो असे सांगून भारतीय बच्चो का बँकेच्या बोगस नोटा देऊन फसवणुक करणार्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. याप्रकरणी चारजणांच्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद मोसीन अबू बिलाल चौधरी ऊर्फ चौधरी, मोहम्मद नफीज अब्दुल रौफ खान ऊर्फ जावेद, सईद तबारक हुसैन सिद्धीकी ऊर्फ सईद बंटाय आणि मंजर इबने इस्माईल सोंडे अशी या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी एक पाच लाखांची वॅगेन कारसहीत भारतीय बच्चो का बँक असे लिहिलेल्या दोनशे नोटा, विविध कंपनीचे सहा मोबाईल आणि सुमारे पन्नास हजार रुपयांची कॅश जप्त केली आहे. या चौघांविरुद्ध फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्यांना किल्ला कोर्टाने सोमवार 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुंबई शहरात गेल्या काही खर्या नोटांच्या बदल्यात दुप्पट तिप्पट नोटा देण्याची बतावणी करुन तकारदारांना भारतीय बच्चो का बँकेच्या बोगस नोटा फसवणुक होत असल्याच्या काही तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. या तक्रारीची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला अशा आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी संबंधित आरोपींची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यानविक्रोळीतील बसडेपोजवळ काहीजण एक लाखाच्या नोटांच्या मोबदल्यात तीन लाख रुपयांच्या भारतीय बनावटीच्या नोटा देण्यासाठी येणार असल्याची माहिती युनिट सहाच्या अधिकार्यांना मिळाली होती.
या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे, पोलीस निरीक्षक सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक धुतराज, सहाय्यक फौजदार देसाई, पोलीस हवालदार चव्हाण, शिंदे, शेख, कदम पोलीस शिपाई ससाने यांनी विक्रोळी बसडेपोजवळ एका कारमधून आलेल्या चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे पोलिसांना शंभर रुपयांच्या भारतीय बच्चो का बँक असे लिहलेल्या दोनशे बोगस नोटा, सहा मोबाईल आणि 50 हजार 550 रुपयांची कॅश जप्त केली. गुन्ह्यांतील पाच लाखांची वॅगेन कारही पोलिसांनी ताब्यात घेतले.
तपासात मोहम्मद नफीज खान, मंजर सोंडे आणि सईद सिद्धीकी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याविरुद्ध पनवेल, दिडोंशी आणि रायगडच्या एएमसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही टोळी खर्या नोटांच्या मोबदल्यात दुप्पट तिप्पट रक्कमेचे आमिष दाखवून अनेकांना बोगस नोटा देऊन गंडा घालत होते. त्यांच्या अटकेने बीकेसी पोलीस ठाण्यातील दोन फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अटकेनंतर या चौघांनाही मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.