काठीने मारहाण करुन मांजरीला पाचव्या मजल्यावरुन फेंकून दिले
मांजरीच्या हत्येप्रकरणी वयोवृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 ऑगस्ट 2025
मुंबई, – घरासमोरच असलेल्या मांजरीला काठीने मारहाण करुन पाचव्या मजल्यावरुन ढकळून तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विलास दत्तात्रय पाठारे या 79 वर्षांच्या वयोवृद्धाविरुद्ध बोरिवली पोलिसांनी विविध कलमांर्तत गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सोसायटीच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. रविवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
ही घटना रविवारी सकाळी साडेनऊ वाजता बोरिवलीतील बाभई, राम मंदिर रोडवरील कृष्णा क्लासिक इमारतीमध्ये घडली. याच इमारतीच्या 502 मध्ये सुषमा किरण म्हात्रे ही महिला राहत असून तिचे पती एका खाजगी कंपनीत मॅनेजर म्हणून कामाला आहे. त्यांच्या घरी चॉकलेट नावाचे एक मांजर होते. घरातील साफसफाई करताना ते मांजरीला फ्लॅटसमोर खेळण्यासाठी सोडत होते. रविवारी 10 ऑगस्टला तिने तिच्या घरातील साफसफाईचे काम हाती घेतले होते. त्यामुळे तिने तिच्या मांजरीला घरासमोर खेळण्यासाठी सोडले होते. मात्र काही वेळानंतर तिला तिची मांजर दिसली नाही.
तिने तिच्या सोसायटीमध्ये तिचा शोध घेतला, यावेळी तिला तिची मांजर फायर पंपाच्या आडोशाला जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आली. तिची काहीच हालचाल नव्हती. ती मृत असल्याचे लक्षात येताच तिने सोसायटीचे सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. त्यात तिला तिच्याच सोसायटीमध्ये राहणारे विलास पाठारे यांनी घराबाहेर खेळणार्या मांजरीला काठीने मारहाण करताना तसेच तिला पाचव्या मजल्यावरुन ढकळून दिल्याचे दिसून आले.
सीसीटिव्ही फुटेजमध्ये हा प्रकार कैद झाल्यानंतर तिने बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून विलास पाठारे याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. विलास पाठारे हे 79 वर्षांचे वयोवृद्ध असल्याने त्यांची लवकरच त्यांच्या घरी जाऊन पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.