पंतप्रधान मुद्रा योजनेतून कर्ज देण्याची बतावणी करुन फसवणुक

33 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी तीन ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 ऑगस्ट 2025
मुंबई, – पंतप्रधान मुद्रा योजनेतून कर्ज देण्याची बतावणी करुन एका व्यावसायिकाची तीन सायबर ठगांनी सुमारे 33 लाखांची फसवणुक केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी नितीनकुमार, आश्विनकुमार आणि दयाशंकर मिश्रा नाव सांगणार्‍या तीन ठगांविरुद्ध उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलने फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदारांना कर्जासाठी दहा लाखांची गरज होती, मात्र कर्जासाठी त्यांची सायबर ठगांनी त्यांची 33 लाखांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दरम्यान या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

नरपतराम भुपाराम देवासी हे मालाड परिसरात राहत असून त्यांचा इमिटेशन ज्वेलरी पॅकिंगचा व्यवसाय आहे. त्यांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी दहा लाखांच्या कर्जाची गरज होती. त्यामुळे जून 2025 रोजी त्यांनी एक अ‍ॅप डाऊनलोन करुन तिथे कर्जासाठी अर्ज केला होता. काही दिवसांनी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन त्याचे नाव नितीनकुमार असून तो प्रधानमंत्री मुद्रा योजना येथून बोलत असल्याचे सांगितले. त्यांची बीकेसी येथे एक शाखा असून त्यांना दहा लाखांचे कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्याला कर्जासाठी अर्ज करुन अर्जासोबत त्यांचे वैयक्तिक कागदपत्रे पाठविली होती. त्यानंतर त्याने त्यांना त्यांचे कर्ज मंजूर झाल्याचे पत्र व्हॉटअपवर पाठविले होते. त्यासाठी त्याने त्यांच्याकडे प्रोसेसिंग फीसह इतर कामासाठी पैशांची मागणी सुरु केली होती.

याच दरम्यान त्यांना आश्विनकुमार नाव सांगणार्‍या व्यक्तीने कॉल करुन त्याला त्यांचा मोबाईल क्रमांक नितीनकुमारने दिल्याचे सांगितले. तो स्टेट बॅकेत कामाला असून त्याने त्यांचा विश्वास बसावा म्हणून स्वतचे ओळखपत्र व्हॉटअपवर पाठविले होते. कर्जासाठी वेगवेगळे चार्ज आणि कारण सांगून त्याने त्यांना तातडीने पैसे जमा करण्यास सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला 9 लाख 53 हजार 177 रुपये विविध बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या मित्रांकडून उसने पैसे घेतले होते. त्यांच्या सांगण्यावरुन त्यांच्या मित्रांनी विविध बँक खात्यात 46 हजार251 रुपये पाठविले होते.

मात्र दिलेल्या मुदतीत दोघांनी त्यांच्या कर्जाची रक्कम बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. या दोघांचेही मोबाईल बंद येत होते. याच दरम्यान त्यांनी पैसे पाठविलेल्या एका व्यक्तीला कॉल केला होता. त्याने त्याचे नाव दयाशंकर मिश्रा असल्याचे सांगून एका अर्थपुरवठा कंपनीत कामाला असल्याचे सांगितले. त्यांनी त्याला घडलेला प्रकार सांगितला. यावेळी त्याने त्यांना कर्जाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून प्रोसेसिंगसह इतर कामासाठी 18 लाख 73 हजार 700 रुपये घेतले होते, मात्र त्यानेही त्यांना कर्ज मिळवून दिले नाही.

अशा प्रकारे कर्ज देण्याची बतावणी करुन नितीनकुमार, आश्विनकुमार आणि दयाशंकर मिश्रा नाव सांगणार्‍या तीन ठगांनी त्यांची सुमारे 33 लाखांची ऑनलाईन फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी स्थानिक पोलिसांसह उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलमध्ये तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. फसवणुकीची रक्कम ज्या बँक खात्यात जमा झाली आहे, त्या बँक खात्याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. या माहितीनंतर संबंधित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page