व्यावसायिक वादातून प्रतिस्पर्धी व्यावसायिकांना खोट्या गुन्ह्यांत अडविण्याची योजना
४ देशी बनावटीचे पिस्तूल ५९ काडतुसासह दोन व्यावसायिकांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ एप्रिल २०२४
विरार, – व्यावसायिक वादातून प्रतिस्पर्धी व्यावसायिकांना खोट्या गुन्ह्यांत अडकाविण्यसाठी त्यांच्या दुकानात घातक शस्त्रे ठेवण्याची योजना बनविणार्या दोन व्यावसायिकांना स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. फिरोज ऊर्फ इब्राहिम आलम शफीउल्ला चौधरी आणि शाकीर अब्दुल वहाब चौधरी अशी या दोघांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी ४ देशी बनावटीचे बनावटीचे पिस्तूल आणि ५९ जिवंत काडतुसे हस्तगत केले आहेत. या दोघांविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांनी दोन पिस्तूल आणि काडतुसे वर्सोवा पुलावरुन समुद्रात फेंकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ते पिस्तूल लवकरच हस्तगत केले जाणार आहे.
३० मार्चला गोल्डन नेस्ट सर्कलजवळील आलम स्टिल ऍण्ड फर्निचर येथे काम करणार्या एका कर्मचार्याकडे घातक शस्त्रे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी दुकानात छापा टाकून फिरोज चौधरी आणि शाकीर चौधरी या दोन व्यावसायिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे पोलिसांना दोन गावठी पिस्तूल आणि सोळा जिवंत काडतुसे सापडले होते. चौकशीदरम्यान ते दोघेही व्यावसायिक असून त्यांचे प्रतिस्पर्धी व्यावसायिकासोबत वाद सुरु होता. फिरोज चौधरी याला व्यवसायात अमान स्टिल किचन इक्वीमेंटचे मालक अनिस ऊर्फ मुन्ना खान, कमील खान ऊर्फ कलीम आणि शादाब स्टिलचा मालक शादाब यांच्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे या तिन्ही प्रतिस्पर्धी व्यावसायिकांना धडा शिकविण्यासाठी त्याने त्याचा परिचित आणि पूर्वी काम करणारा कर्मचारी मुस्लिम याच्याकडून सहा गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे मागविले होते. त्यापैकी दोन पिस्तूल आणि काडतुसे त्याने तीन दिवसांपूर्वी स्वत अनिस ऊर्फ मुन्ना खान याच्या दुकानातील वडापाव-पाणीपुरीसाठीचे काऊंटरच्या कपाटात ठेवले होते. त्यानंतर दोन पिस्तूल आणि बारा काडतुसे एका बॅगेत ठेवून ते वर्सोवा पुलावरुन खाडीत फेंकून दिले होते. तसेच त्याच्याकडील पिस्तूल आणि काडतुसे तो कलीम यांच्या दुकानात ठेवली होती तर शाकीरकडील पिस्तूल आणि काडतुसे शादाब स्टिल दुकानात ठेवणार होता. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी अनिस खान यांच्या दुकानातून दोन गावठी पिस्तूल आणि ४३ जिवंत काडतुसे जप्त केले. अशा प्रकारे दोन्ही कारवाईत पोलिसांनी चार देशी बनावटीचे पिस्तूल आणिण ५९ जिवंत काडतुसे जप्त केले आहे. फिरोज चौधरी आणि शाकीर चौधरी हे दोघेही मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी असून व्यावसायिक आहेत. प्रतिस्पर्धी व्यावसायिकांमुळे व्यवसायात झालेल्या नुकसानीचा सूड घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या दुकानात घातक शस्त्रे ठेवून त्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकाविण्याची योजना बनविली होती. मात्र त्यांची योजना यशस्वी होण्यापूर्वीच या दोन्ही व्यावसायिकांना पोलिसांनी घातक शस्त्रांसह अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, प्रकाश गायकवाड, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ, मिरारोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजयकुमार मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, पृथ्चीराज सुर्वे, सहाय्यक फौजदार संदीप शिंदे, पोलीस हवालदार अविनाश गर्जे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, सचिन हुले, सचिन सावंत, विजय गायकवाड, सुधीर खोत, विकास राजपूत, पोलीस शिपाई प्रशांत विसपुते, सनी सूर्यवंशी, गौरव बारी, धिरज मेंगाणे, काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस उपनिरीक्षक खाडे, पोलीस हवालदार मोहीते यांनी केली.