मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 ऑगस्ट 2025
मुंबई, – हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करणार्या एका व्यक्तीला घातक शस्त्रांसह अॅण्टॉप हिल पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. सरबजीतसिंह कवलजितसिंह बजवा असे या 52 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर, एक बारा बोअर बॅरेल गन, 12 बार बोअर प्लास्टिक काडतुसे आणि 49 जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सरबजीतसिंह बजवा हा अॅण्टॉप हिल परिसरात राहत असून एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. त्याच्याकडे घातक शस्त्रे असून त्यांनी ते शस्त्रे त्याच्या राहत्या घरी ठेवली आहेत अशी माहिती अॅण्टॉप हिल पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पावडे, पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पोलीस हवालदार सागर घस्ते, पोलीस शिपाई दिनेश पाटील सुधीर माने, अनिल बाबर, निलेश माने, महिला पोलीस शिपाई सोनावणे यांनी अॅण्टॉप हिल येथून सरबजीतसिंग बजवा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
त्याच्या घराची झडतीदरम्यान पोलिसांना दोन अग्निशस्त्रे आणि 67 जिवंत काडतुसांचा साठा सापडला. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. सरबजीतसिंहची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. त्याला ते घातक शस्त्रे कोणी दिले, ते शस्त्रे कोणाला विकणार होता का, या शस्त्रांचा कुठल्या गुन्ह्यांत वापर झाला होता का, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.