गिरणी कामगाराच्या म्हाडा फ्लॅटच्या बहाण्याने फसवणुक

37 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 ऑगस्ट 2025
मुंबई, – गिरणी कामगारांना देण्यात आलेला म्हाडा फ्लॅट स्वस्तात देतो असे सांगून एका व्यावसायिकाची जोडप्याने सुमारे 37 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार लालबाग परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या जोडप्याविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. रुपेश रमेश सावंत आणि स्नेहा रुपेश सावंत अशी या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिपक गजानन पेडणेकर हे 47 वर्षांचे तक्रारदार लालबाग येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांची स्वतची गिरीजा लॉजिस्टिक इंडिया प्रायव्हेट लिमिटे नावाची एक खाजगी फर्म आहे. नऊ वर्षांपूर्वी त्यांना एक फ्लॅट विकत घ्यायचा होता. यावेळी त्यांच्या एका परिचिताने त्यांची ओळख रुपेश सावंतशी करुन दिली होती. रुपेश हा म्हाडाची गिरणी कामगारांची रुम स्वस्तात मिळवून देत असल्याचे सांगितले होते. त्याने आतापर्यंत अनेकांना म्हाडाचे रुम विक्री केली असून तोच त्यांना मदत करेल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी रुपेशची भेट घेतली होती. यावेळी रुपेशने तो म्हाडाचा एजंट असल्याचे सांगून त्यांना एका गिरणी कामगाराचा फ्लॅट 39 लाखांना मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांच्यात एक करार झाला होता. या करारानंतर त्यांनी त्याला टप्याटप्याने 37 लाख रुपये दिले होते.

मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना म्हाडाचा फ्लॅट दिला होता. ज्या गिरणी कामगाराचा फ्लॅट रुपेश देणार होता, त्या कामगाराकडे चौकशी केल्यानंतर त्याला रुपेशने रुमसाठी एकही रुपया दिला नसल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी रुपेशकडे पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी रुपेश, त्याची पत्नी स्नेहा आणि मित्र अनिल मुळीक यांनी त्यांच्या नावे असलेली सातार्‍यातील पाटण तालुक्यातील 62 गुंठे जमिन विक्री करुन त्यांना पैसे देण्याचे आश्वासन दिले. मात्र वारंवार विचारणा करुनही त्याने त्यांना 37 लाख रुपये परत केले नाही. त्यामुळे ते त्यांच्या गावी गेले होते. यावेळी रुपेशचे वडिल आणि चुलत्यांनी त्यांनाच हातपाय तोडून देण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तक्रारदार त्यांच्या वकिलासह मुंबईत परत आले होते.

म्हाडाचा रुम देतो असे सांगून रुपेश आणि त्याची पत्नी स्नेहा यांनी त्यांची फसवणुक केल होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्याविरुद्ध काळाचौकी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर रुपेश सावंत आणि स्नेहा सावंत या पती-पत्नीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांनी म्हाडा फ्लॅट देतो असे सांगून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page