चार कोटीच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक

तीन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीचा गुन्ह्यांची नोंद

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 ऑगस्ट 2025
मुंबई, – सुमारे चार कोटीच्या सोन्याच्या विविध दागिन्यांचा अपहार करुन तीन ज्वेलर्स व्यापार्‍यांची फसवणुक झाल्याची घटना काळबादेवी, शेख मेनन स्ट्रिट आणि धनजी स्ट्रिट परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एल. टी मार्ग पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध तीन वेगवेगळ्या अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. भावेश सोळंकी, रमेश रतनचंद जैन, दयाशंकर चौथमल शार्म आणि अवनिश गोल्डी अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांनाही पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार ललित मोहन सोनी हे काळबादेवी परिसरात राहत असून तिथेच त्यांच्या मालकीचे शाईन गोल्ड नावाचे एक ज्वेलर्स शॉप आहे. याच शॉपमध्ये रमेश जैन हा कामाला होता. त्याच्यावर विविध ज्वेलर्स व्यापार्‍यांना सोन्याच्या दागिन्यांची विक्री करुन विक्रीचे पेमेंट शॉपमध्ये जमा करण्याची जबाबदारी होती. मे ते जून 2025 या कालावधीत त्यांनी त्यांनी त्याला कर्नाटक येथील ज्वेलर्स व्यापार्‍यांना विक्रीसाठी 4710 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने दिले होते. त्यापैकी 2200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्याने त्यांना परत केले, मात्र उर्वरित सुमारे अडीच कोटीचे 2510 ग्रॅम वजनाचे दागिने परत केले नाही किंवा दागिन्यांचे पेमेंट शॉपमध्ये जमा केले नव्हते. वारंवार विचारणा करुनही तो त्यांना प्रतिसाद देत नव्हता. विविध कारण सांगून तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. रमेश जैनने सोन्याच्या दागिन्यांचा अपहारासह फसवणुक करुन पलायन केल्याचे निदर्शनास येताच त्यांनी त्याच्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती.

दुसर्‍या गुन्ह्यांतील तक्रारदार निलेश बसंतीलाल पामेचा हे कांदिवली येथे राहतात. त्यांचा धनजी स्ट्रिट परिसरात स्वर्णमुद्रा नावाचे एक ज्वेलर्स दुकान असून गेल्या 25 वर्षांपासून त्यांचे कुटुंबिय याच व्यवसायात आहेत. ते ज्वेलर्स व्यापार्‍यांना होलसेलमध्ये सोन्याच्या दागिन्यांची विक्री करतात. दोन वर्षांपूर्वी त्यांची आंधप्रदेशचे महेंद्र ज्वेलर्स मार्टचे मालक भावेश सोळंखी यांच्याशी ओळख झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा त्यांच्यासोबत व्यवहार सुरु होता. भावेशने अनेकदा त्यांना शुद्ध सोने देऊन त्यांच्याकडून दागिने घेतले होते. त्यामुळे त्यांचा त्याच्यावर विश्वास होता. जून 2023 रोजी भावेश हा त्यांच्या दुकानात आला होता. त्याने त्यांच्याकडून 1 कोटी 35 लाख रुपयांचे 1810 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने दागिन्याचे पेमेंट केले नव्हते. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे पेमेंटविषयी विचारणा केली होती, मात्र त्याने पेमेंट दिले नाही किंवा क्रेडिटवर घेतलेले सोन्याचे दागिने परत केले नाही. गेल्या दोन वर्षांपासून ते भावेशकडून सतत पाठपुरावा करत होते. मात्र त्याने त्यांच्या दागिन्यांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. या घटनेनंतर त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती.

तिसर्‍या घटनेत सुमारे अठरा लाखांचे सोन्याचे दागिने दोघांनी पलायन केले. त्यात दयाशंकर शर्मा आणि अवनिश गोल्डी यांचा समावेश आहे. प्रतिक पवनकुमार परमार हे ज्वेलर्स व्यापारी असून त्यांचा शेख मेनन स्ट्रिटवर सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे दयाशंकर आणि अवनिश हे दोघेही मित्र आहेत. यातील दयाशंकरचा न्यू बाईट कुरिअर कंपनी तर अनविश हा गोल्ड ज्वेल्सचा मालक आहे. फेब्रुवारी महिन्यांत या दोघांनी त्यांच्याकडून अठरा लाखांचे 217 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेतले होते. मात्र दागिन्यांचे पेमेंट न देता त्यांनी त्यांची फसवणुक केली होती.

या घटनेनंतर त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तिन्ही घटनेनंतर पोलिसांनी रमेश जैन, भावेश सोळंखी, दयाशंकर शर्मा आणि अवनिश गोल्डी या चौघांविरुद्ध सुमारे चार कोटीच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन तीन ज्वेलर्स व्यापार्‍यांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पळून गेलेल्या या चारही आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page