अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन व्यक्तींचा मृत्यू

अपघातानंतर दोन्ही चालकांचे घटनास्थळाहून पलायन

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 ऑगस्ट 2025
मुंबई, – भरवेगात जाणार्‍या दोन अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना वांद्रे परिसरात घडली. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन अपघातानंतर पळून गेलेल्या आरोपी वाहनचालकाचा शोध सुरु केला आहे. मृतांमध्ये अब्दुल लतीफ रेहमान कुरेशी आणि निळकंठ कासू चव्हाण यांचा समावेश आहे. यातील अब्दुल यांच्या बाईकला तर निळकंठ यांना रस्ता क्रॉस करताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पहिला अपघात बुधवारी सायंकाळी सव्वाचार वाजता वांद्रे येथील बीकेसी कनेक्टर, एमएमआरडीए जंक्शनजवळील दक्षिण वाहिनीवर झाला. मोहम्मद जाफर अब्दुल रेहमान खान हे 63 वर्षाचे वयोवृद्ध ट्रॉम्बे, चिता कॅम्प परिसरात राहतात. मृत अब्दुल (58) हा त्यांचा लहान भाऊ असून तो एका मटन शॉपमध्ये कामाला आहे. सध्या तो त्यांच्या कुटुंबियांसोबत वांद्रे येथील बीकेसी, पथ्थर नगरात राहत होता. बुधवारी सायंकाळी तो त्याच्या बाईकवरुन जात होता. एमएमआरडीए जंक्शन, बीकेसी कनेक्टर दक्षिण वाहिनीवर येताच त्याच्या बाईकला एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती. अपघातात जखमी झालेल्या अब्दुलला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

दुसरा अपघात मंगळवारी रात्री आठ ते सव्वाआठच्या सुमारास वांद्रे येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, टिचर कॉलनी बसस्टॉपसमोरील दक्षिण वाहिनीवर झाला. रविना निळकंठ चव्हाण ही महिा वांद्रे येथील संत ज्ञानेश्वरनगरात राहत असून मृत निळकंठ हे तिचे पती आहे. रविना ही घरकाम तर तिचे पती निळकंठ हे कडीयाकाम करतात. मंगळवारी रात्री आठ वाजता तिचे पती कामावरुन घरी येत होते. टिचर कॉलनी बसस्टॉपसमोरुन रस्ता क्रॉस करताना भरवेगात जाणार्‍या एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले होते.

या दोन्ही अपघातानंतर वाहनचालक जखमी झालेल्या दोघांनाही कुठलीही वैद्यकीय मदत अथवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेले होते. त्यामुळे रविना चव्हाण आणि मोहम्मद जाफर खान यांच्या तक्रारीवरुन खेरवाडी पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद केली होती. हलगर्जीपणाने वाहन चालवून दोन व्यक्तींच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या या दोन्ही चालकांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्यासाठी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून या फुटेजवरुन आरोपी चालकांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page