रस्त्यावरील गटाराच्या मेनहोलचे लोखंडी झाकण चोरीचा पर्दाफाश
सात गुन्ह्यांची उकल करुन मुख्य आरोपी रिक्षाचालकाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 ऑगस्ट 2025
मुंबई, – रात्रीच्या वेळेस रिक्षातून येऊन सार्वजनिक रस्त्यावरील गटारावर बसवलेले मेनहोलचे लोखंडी झाकण चोरी करणार्या एका टोळीचा एमएचबी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी नारायण भीमराव घायाळ नावाच्या एका मुख्य आरोपी असलेल्या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली तर त्याचा दुसरा सहकारी सुरज दिवाकर ऊर्फ गबरु हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांनी चार महिन्यांत विविध परिसरातील मेनहोलची झाकण चोरीची कबुली दिली असून नारायणच्या अटकेने सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
गेल्या काही महिन्यांत बोरिवली-दहिसर परिसरात सार्वजनिक रस्त्यावरील गटाराच्या मेनहोलच्या झाकण चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. रात्रीच्या वेळेस होणार्या झाकण चोरीची घटनेने स्थानिक रहिवाशांच्या जिवीतास धोका निर्माण झाला होता. त्यातून अपघात होण्याची शक्यता असल्याने त्याची अतिरिक्त पोलीस अयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष धनवटे यांनी गंभीर दखल घेत एमएचबी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला होता. या फुटेजची पाहणीदरम्यान रात्रीच्या वेळेस रिक्षातून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी संबंधित मेनहोलचे झाकण चोरी केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या रिक्षाची माहिती काढून वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिश गवळी, पोलीस निरीक्षक अतुल आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरडे, पोलीस हवालदार संदीप परिट, सतीश देवकर, पोलीस शिपाई अर्जुन आहेर, गणेश शेरमाळे, सचिन मंजुळे, आदित्य राणे यांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना नारायण घायाळ याला पोलिसांनी गुन्ह्यांतील रिक्षासह ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्याने गुन्ह्यांची कबुली देताना सुरज दिवाकर या सहकार्याच्या मदतीने मेनहोलचे झाकण चोरी केल्याचे सांगितले. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील रिक्षा जप्त केली असून चोरीचे मेनहोलचे झाकण लवकरच हस्तगत केले जाणार आहे. त्यांच्या अटकेने एमएचबी पोलीस ठाण्यातील सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. सुरज दिवाकर हा फरार असल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.