मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 ऑगस्ट 2025
मुंबई, – वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या एका 21 वर्षांच्या आरोपी महिलेने जे. जे हॉस्पिटलमधून पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रुबीना इर्शाद शेख असे या महिलेचे नाव असून ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे पोलिसांनी सांगितले. कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी रुबीनाविरुद्ध जे. जे मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
रुबीना ही मूळची साहेबगंज राज, बालोंगासच्या सत्तरतोलाची रहिवाशी असून सध्या नवी मुंबईतील सेक्टर पाच, कौपरखैरणे परिसरात राहत होती. तिच्याविरुद्ध नवी मुंबई पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून फसवणुक करुन पासपोर्ट मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिच्यावर नवी मुंबई पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. याच गुन्ह्यांत ती सध्या न्यायायीन कोठडीत होती. त्यामुळे तिला भायखळा जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते.
ती पाच महिन्यांची गरोदर होती. त्यात तिला थंडीताप, त्वचेसंबंधी आजार झाल्याने वैद्यकीय उपचारासाठी गुरुवारी सकाळी अकरा वाजता जे. जे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. यावेळी तिच्यासोबत काही महिला कर्मचारी उपस्थित होत्या. उपचारासाठी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र हॉस्पिटलमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन ती महिला पोलीस शिपाई काजल रामचंद्र शिंदे हिच्या हातावर झटका देऊन हॉस्पिटलमधून पळून गेली होती. तिचा पोलिसांनी शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही.
या घटनेनंतर काजल शिंदे यांनी जे. जे मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून रुबीनाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत रुबीनाच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यामुळे हॉस्पिटलसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पळून गेलेल्या रुबीनाच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. तिला लवकरच अटक केली जाईल. या गुन्ह्यांचा तपास एपीआय प्रशांत बोरसे यांच्याकडे असल्याचे सांगण्यात आले.