भरस्त्यात तरुणीवर हल्ला करणार्‍या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक

गुन्हे शाखेच्या युनिट सहाची नवी मुंबईत कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 ऑगस्ट 2025
मुंबई, – घरी जाणार्‍या एका 23 वर्षांच्या तरुणीवर भरस्त्यात लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करुन पळून गेलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला नवी मुंबईतून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. सुमीत ऊर्फ पिंट्या संघरक्षक सोरटे असे या 32 वर्षीय गुन्हेगाराचे नाव असून अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी चेंबूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या हल्ल्यामागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही, मात्र वैयक्तिक कारणावरुन हा हल्ला झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. सुमीत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अकराहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांनी सांगितले.

ही घटना शुक्रवारी 15 ऑगस्टला मध्यरात्री एक वाजता चेंबूर येथील के. एन गायकवाड मार्ग, सिद्धार्थ कॉलनी, भैरव ज्वेलर्स दुकानासमोर घडली. चेंबूर परिसरात धनश्री ही तरुणी तिच्या कुटुंबियांसोबत राहते. गुरुवारी ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. मैत्रिणीच्या घरातून ती तिच्या जात होती. भैरव ज्वेलर्स दुकानासमोर येताच तिथे सुमीत सोरटे आला. तो याच परिसरात राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. त्याने तिला रस्त्यावर अडविले, त्यानंतर त्यांच्या कुठल्या तरी कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात त्याने तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात धनश्री ही गंभीररीत्या जखमी झाली होती.

हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास येताच त्यांनी ती माहिती चेंबूर पोलिसांना दिली. या माहितीनंतर घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी जखमी झालेल्या धनश्रीला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच तिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे. तिच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीवरुन पोलिसांनी सुमीत सरोटे याच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपासात सुमीत हा चेंबूच्या सिद्धार्थ कॉलनी, चंदू शिंदे प्लॉटमध्ये राहतो. तो मुंबई पोलिसांच्या अभिलेखावरील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

त्याच्याविरुद्ध चेंबूर, चुन्नाभट्टी, नेहरुनगर पोलीस ठाण्यात मारामारी, शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देणे, अपहरण, लैगिंक अत्याचार, घरफोडी, चोरी, विनयभंग, गंभीर दुखापत करणे अशा अकराहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यातील बहुतांश गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या जामिनावर बाहेर होता. त्याच्याविरुद्ध यापूर्वी पोलिसांनी तीन ते चार वेळेस प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. जून 2025 रोजी त्याच्यावर दोन वर्षांसाठी मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतून तडीपारची कारवाई करण्यात आली होती. तडीपारची ही कारवाई सुरु असताना त्याने धनश्री या तरुणीवर प्राणघातक हल्ला केला होता.

हल्ल्यानंतर तो पळून गेला होता. त्यामुळे या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत चेंबूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला आरोपीच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सुमीत हा नवी मुंबईत लपला असल्याची माहिती पोलीस हवालदार खेडकर यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे व त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक धुतराज, पोलीस हवालदार खेडकर, ससाने, जायभाय यांनी नवी मुंबईतील वाशी, कामगार हॉस्पिटलजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती.

सोमवारी तिथे सुमीत आला असता त्याला पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलीस पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच धनजीवर प्राणघातक हल्ला केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला अटक करुन पुढील कारवाईसाठी चेंबूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page