पोलीस वसाहतीत चोरी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार गजाआड

एक वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीविरुद्ध पंधरा गुन्हे दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 ऑगस्ट 2025
मुंबई, – मुंबईसह ठाण्यातील पोलीस वसाहतीत रेकी करुन चोरी करणार्‍या एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला माहीम पोलिसांच्या एका विशेष पथकाने नवी मुंबईतून अटक केली. कमलजीत कुलजीत सिंह ऊर्फ असे या गुन्हेगाराचे नाव असून तो मूळचा पंजाबचा रहिवाशी आहे. सध्या नवी मुंबईतील कौपरखैरणे परिसरात राहतो. गेल्या एक वर्षांपासून तो घरफोडीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड होता. त्याच्याविरुद्ध मुंबईसह ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यात पंधराहून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. काही वर्षापूर्वी त्याने एका पोलीस अधिकार्‍याची सर्व्हिस पिस्तूलची चोरी केली होती. या गुन्ह्यांत जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पळून गेला होता.

रत्नाकर हरिश्चंद्र पाटील हे पोलीस हवालदार असून ते त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत माहीम येथील पोलीस वसाहतीत राहतात. त्यांचा पंधरा वर्षांचा मुलगा शौर्य हा कोल्हापूर येथे शिक्षण घेतो. 18 ऑगस्ट 2024 रोजी ते त्यांच्या मुलाला कोल्हापूर येथे शाळेत सोडण्यासाठी गेले होते. तसेच त्यांची पत्नी क्रांती ही त्यांची सतरा वर्षांची मुलगी श्रेयासोबत रक्षाबंधनासाठी रोहा येथील गावी गेली होती. यावेळी त्यांच्या घरी कोणीही नव्हते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला होता. कपाटातील विविध सोन्याचे दागिने आणि वीस हजार रुपयांची कॅश असा 9 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन या चोरट्याने पलायन केले होते.

दोन दिवसांनी रत्नाकर पाटील हे कोल्हापूर येथून मुुंबईत आले होते. यावेळी त्यांना त्यांच्या घरी घरफोडी झाल्याचे दिसून आले. अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करुन विविध सोन्याचे दागिने आणि कॅश असा मुद्देमाल चोरी केला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी माहीम पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस वसाहतीत घुसून एका पोलीस हवालदाराच्या घरी झालेल्या घरफोडीच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत माहीम पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र सानप, पोलीस शिपाई वाघमोडे, शिंदे, कांबळे, घरत, बच्छाव, तडासम, ढोंबळे आदींनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला होता.

या फुटेजवरुन आरोपीची ओळख पटली होती. त्याचा शोध सुरु असताना तो पंजाब येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस पथक तिथे गेले होते,मात्र पोलिसांची चाहूल लागताच तो तेथून पळून गेला होता. गेल्या एक वर्षांपासून पोलीस पथक त्याच्या मागावर होते. मात्र तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. तरीही त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना तो नवी मुंबईत राहत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र सानप व अन्य पोलीस पथकाने कोपरखैरणे येथून कमलजीत सिंह याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चौकशीत त्यानेच रत्नाकर पाटील यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली. कमलजीत हा घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मुंबईसह ठाण्यात पंधराहून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. तो पोलीस वसाहतींना टार्गेट करत होता. दिवसा रेकी केल्यानंतर रात्रीच्या वेळेस तो पोलीस वसाहतीत चोरी करुन पळून जात होता. अखेर एक वर्षांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्याच्या अटकेने काळाचौकी आणि आरसीएफ पोलीस ठाण्यातील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून लवकरच चोरीचा मुद्देमाल जप्त केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page