81 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी सूनेसह दोघींविरुद्ध गुन्हा दाखल
पतीच्या निधनानंतर कंपनीसह वैयक्तिक बँक खात्यातून पैशांचा अपहार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 ऑगस्ट 2025
मुंबई, – सुमारे 81 लाख रुपयांच्या अपहारासह फसवणुकीप्रकणी सूनेसह कंपनीच्या महिला कर्मचारी अशा दोघांविरुद्ध एमएचबी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रिया सचिन देढिया ऊर्फ प्रिया सावला आणि ड्रिजल गोन्साविल्स अशी या दोघींची नावे आहेत. पतीच्या अपघाती निधनानंतर प्रियाने खाजगी कंपनीसह वैयक्तिक बॅक खात्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे तसेच याकामी तिला कंपनीची महिला कर्मचारी ड्रिजलने मदत केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यांत या दोघींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. विशेष म्हणजे दोघींविरुद्ध प्रियाच्या सासर्यांनी लेखी अर्जाद्वारे तक्रार केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
76 वर्षाचे वयोवृद्ध तक्रारदार महेंद्र विसनजी देढिया हे त्यांच्या कुटुंबियांसोबत बोरिवली येथे राहतात. त्यांचा सचिन नावाचा एक मुलगा असून त्याच्यासोबत त्यांनी पार्टनरशीपमध्ये महेन टेक्नोलॉजिज प्राव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी सुरु केली होती. कंपनीचे रजिस्ट्रेशन महेंद्र देढिया यांच्या राहत्या घराचे असून बोरिवली येथे कंपनीचे एक खाजगी कार्यालय होते. कंपनीत त्यांच्यासह सचिन हे दोघेही संचालक म्हणून कार्यरत होते. ही कंपनी वेगवेगळ्या शासकीय विभागांना सायबर सिक्युरिटीचे ट्रेनिंग देण्याचे काम करत होती. तिथेच ड्रिजल गोन्साविल्स ही महिला कामाला होती. दहा वर्षांपूर्वी सचिनने प्रिया सावला हिच्याशी लग्न केले होते. लग्नानंतर त्यांना एक दोन वर्षांचा मुलगा होता.
11 एप्रिल 2025 रोजी पुण्यातील सोमटणे फाटा परिसरात सचिनच्या कारला अपघात झाला होता. त्यात त्याचा अपघाती मृत्यू झालाद होता. त्याच्या कारला मागून येणार्या एका कंटेनरने धडक दिली होती. कामानिमित्त सचिन मुंबईसह देशभरात जात होता. त्यामुळे कंपनीशी संबंधित सर्व महत्त्वाचे दस्तावेज त्याच्याकडे होते. ते दस्तावेज त्याने कंपनीच्या त्याच्या केबीनमध्ये सुरक्षित ठेवले होते. सचिनच्या अपघातानतर त्याचा लॅपटॉप आणि मोबाईल पुणे पोलिसांकडून देढिया कुटुंबियांना सोपविण्यात आला होता. सचिनचा लॅपटॉप आणि मोबाईल नंतर ड्रिजलने तिच्यासोबत नेला होता. याबाबत त्यांना कुठलीही कल्पना नव्हती. सचिनच्या अंत्यविधी आणि शोकसभेनंतर प्रिया सावला तेथून निघून गेली आणि त्यानंतर तिने त्यांच्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क साधला नव्हता.
एप्रिल 2025 रोजी महेंद्र देढिया हे त्यांच्या बँकेत पासबुक अपडेट करण्यासाठी गेले होते. यावेळी बँक कर्मचार्याने त्यांच्या कंपनीच्या खात्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे सांगितले. संबंधित आर्थिक व्यवहार त्यांनी केले नव्हते. त्यामुळे त्यांना धक्काच बसला होता. या व्यवहाराची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कंपनीच्या बँक खात्यात इतर काही बँक खात्यात लाखो रुपये ट्रान्स्फर झाल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी बँकेला संबंधित खाते फ्रिज करण्याची विनंती केली होती. या घटनेनंतर त्यांनी प्रियाला व्हॉटअप मॅसेज, मेल आणि पोस्टाने लेटर पाठवून विचारणा केली होती, मात्र तिच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
काही दिवसांनी महेंद्र देढिया यांची मुलगी उर्वी हिने प्रियाला संपर्क साधून कंपनीच्या बँक खात्यातील गैरव्यवहार थांबवून त्यांच्याशी संपर्क साधावा, त्यांचा नातू घरी घेऊन यावे, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाई करावी लागेल असे सांगितले होते, मात्र प्रियाने तुम्हाला जे करायचे आहे ते करा असे सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर महेंद्र देढिया यांनी त्यांच्या कंपनीसह सचिनच्या इतर बँक खात्याची माहिती काढून त्या बँक खात्यातील अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.
यावेळी त्यांना 12 एप्रिल ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत कंपनीसह सचिनच्या बँक खात्यातून सुमारे 81 लाख रुपये काढण्यात आल्याचे दिसून आले. ही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. हा संपूर्ण आर्थिक व्यवहार प्रिया सावलाने ड्रिजल गोन्साविल्सच्या मदतीने केला होता. सचिनच्या मृत्यूनंतर तिनेच ड्रिजलच्या मदतीने सचिनचा लॅपटॉप आणि मोबाईल प्राप्त करुन त्यातील बँक खात्यातील माहिती घेऊन सुमारे 81 लाखांचा अपहार करुन फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच महेंद्र देढिया यांनी त्यांची सून प्रिया सावला आणि कंपनीतील महिला कर्मचारी ड्रिजल गोन्साविल्स यांच्याविरुद्ध एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर या दोघींविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघींची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.