दादर-अंधेरी लोकल प्रवासादरम्यान अल्पवयीन मुलीचा विनयभंग
आरोपी प्रवाशाविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ एप्रिल २०२४
मुंबई, – परळच्या रुग्णालयातून औषधोपचार करुन वडिलांसोबत घरी जाताना दादर-अंधेरी लोकल प्रवासादरम्यान एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नूर अहमद शब्बीर अन्सारी या आरोपीविरुद्ध मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. आरोपीला पकडून प्रवाशांनी मारहाण केल्याने त्याच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरु होते, सोमवारी सायंकाळी डिस्चार्ज दिलनंतर त्याला रेल्वे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला मंगळवारी विशेष पोक्सो कोर्टात हजर केले जाणार आहे.
पिडीत पंधरा वर्षांची मुलगी ही जोगेश्वरी येथे तिच्या पालकांसोबत राहते. तिला एक गंभीर आजार असल्याने तिला तिचे वडिल दोन दिवसांपूर्वी परळ येथील एका रुग्णालयात घेऊन गेले होते. तिथे तिच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. रात्री आठ वाजता ते घरी जाण्यासाठी निघाले होते. दादर येथून स्लो पकडून ते जोगेश्वरीच्या दिशेने जात होते. वडिलांसोबत पुरुष डब्ब्यातून प्रवास करताना तिला तिसरी सीट बसण्यासाठी मिळाली होती तर समोरच्या सीटवर तिचे वडिल बसले होते. दादरहून वांद्रेच्या दिशेने लोकल जात असताना तिथे नूर अन्सारी आला. चौथी सीटवर बसून त्याने या मुलीशी अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मुलीच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला जाब विचारला होता. याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी डब्ब्यातील इतर प्रवाशांनी नूरला पकडून बेदम मारहाण केली होती. तो जखमी झाला होता. ही लोकल अंधेरी रेल्वे स्थानकात येताच जखमी झालेल्या नूरला प्रवाशांनी रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करुन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे त्याला पोलिसांनी तातडीने कूपर रुग्णालयात दाखल केले होते. दुसरीकडे मुलीच्या वडिलांनी नूरविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोच्या गुन्ह्यांची नोंद केली होती. या गुन्ह्यांचा तपास नंतर मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडे सोपविण्यात आला. नूरवर उपचार सुरु असल्याने त्याला या गुन्ह्यांत अटक झाली नव्हती. सोमवारी सायंकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गेल्या काही दिवसांत लोकलमध्ये अशा घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे अशा दोषी प्रवाशांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून सर्वच पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहे.