ऑनलाईन कुर्ता ऑर्डर करणे वयोवृद्ध महिलेला महागात पडले
दोन हजाराच्या कुर्तासाठी सायबर ठगाकडून सहा लाखांना गंडा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 ऑगस्ट 2025
मुंबई, – ऑनलाईन पोर्टलवरुन कुर्ता ऑर्डर करणे एका 63 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेला चांगलेच महागात पडले आहे. दोन हजाराच्या कुर्ताच्या अज्ञात सायबर ठगाने तिची सुमारे सहा लाखांची ऑनलाईन फसवणुक केली. याप्रकरणी व्ही. पी रोड पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
तक्रारदार वयोवृद्ध महिला ही तिच्या मुलीसोबत गिरगाव येथील व्ही. पी रोड पोलीस ठाण्याजवळील एका निवासी इमारतीमध्ये राहते. एका खाजगी कंपनीत ती कामाला आहे. जुलै महिन्यांत ती युट्यूबवर लेडीज कुर्ती सर्च करत होती. यावेळी तिला यूट्यूब चॅनेलवर एक लेडीज कुर्ती दिसली, कुर्ती आवडल्याने तिने ऑनलाईन 1950 रुपयांचे पेमेंट केले होते. मात्र एक आठवडा होऊन तिची डिलीव्हरी आली नव्हती. त्यामुळे तिने अॅपवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून याबाबत विचारणा केली होती. यावेळी तिला समोरुन बोलणार्या महिलेने लवकरच तिची डिलीव्हरी होईल असे सांगितले.
मात्र दोन ते तीन दिवस उलटूनही तिला कुर्तीची डिलीव्हरी मिळाली नाही, त्यामुळे तिने संबंधित कुरिअर कंपनीचा मोबाईल क्रमांक मिळविला होता. यावेळी समोरुन बोलणार्या व्यक्तीने त्यांचा पत्ता चुकीचा होता, त्यामुळे त्यांची डिलीव्हरी दिलेल्या वेळेत झाला नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तिला सहा रुपयांचे पेमेंट करण्यास सांगून तिला अॅपवर तिची माहितीसह आधारकार्ड व घरचा पत्ता अपलोड करण्यास सांगितले. अॅपवर लॉगिंन केल्यानंतर तिला ओटीपी शेअर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते.
ओटीपी शेअर केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाने तिच्या बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार केले होते. त्यातून तिच्या खात्यातून सहा लाख रुपये डेबीट झाले होते. पैसे डेबीट झाल्याचा मॅसेज प्राप्त होताच तिला फसवणुकीचा हा प्रकार लक्षात आला होता. त्यानंतर तिने बँकेत जाऊन तिचे अकाऊंट फ्रिज केले होते. घडलेल्या प्रकारानंतर तिने व्ही. पी रोड पोलिसांत तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा पोलीस ठाण्यातील सायबर सेलचे अधिकारी तपास करत आहेत.