मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 ऑगस्ट 2025
मुंबई, – एमडी ड्रग्जच्या गुन्ह्यांत एका 30 वर्षांच्या महिलेस माहीम पोलिसांनी अटक केली. फौजिया आजम राही असे या महिलेचे नाव असून तिच्याकडून पोलिसांनी 210 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. या ड्रग्जची किंमत सुमारे 21 लाख रुपये इतकी आहे. तिच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत तिला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
फौजिया ही धारावीतील पीएमजी कॉलनीतील एका निवासी इमारतीमध्ये राहते. ती एमडी ड्रग्जची विक्री करत असून ड्रग्जची विक्रीसाठी ती माहीम परिसरात येणार असल्याची माहिती माहीम पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, पोलीस निरीक्षक आशिष पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र सानप, पोलीस शिपाई वाघमोडे, बच्छाव, तडासम, ढोबळे, महिला पोलीस शिपाई सांगळे आदी पथकाने माहीमच्या माहीम-सायन लिंक रोड, रेहजा ब्रिजजवळील नयानगर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती.
ठरल्याप्रमाणे तिथे फौजिया राही आली असता तिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्या अंगझडतीत पोलिसांना 210 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत सुमारे 21 लाख रुपये आहे. एमडी ड्रग्जसहीत तिला नंतर पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी आणण्यात आले होते. याप्रकरणी एनडीपीएस कलमातर्गत गुन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत असून तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. तिला ते एमडी ड्रग्ज कोणी दिले, ती ड्रग्ज कोणाला देण्यासाठी आली होती. तिने यापूर्वीही ड्रग्जची विक्री केली आहे का, तिचे इतर कोणी सहकारी आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.