मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 ऑगस्ट 2025
मुंबई, – उत्तरप्रदेशातून मुंबई शहरात चरस विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना मेघवाडी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. रणवीर विजयपाल चौधरी ऊर्फ रणवीर सिंग आणि गजेंद्र सतीशकुमार सिंग अशी या दोघांची नावे असून ते दोघेही उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहेत. या दोघांकडून पोलिसांनी साडेतीन किलो चरसचा साठा जप्त केला असून त्याची किंमत सतरा लाख रुपये आहेत. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने गुरुवार 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई शहरात इतर राज्यातून ड्रग्ज आणून त्याच्या विक्रीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेसह अॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम सुरु केली होती. ही मोहीम सुरु असताना उत्तरप्रदेशातून काहीजण चरसचा साठा घेऊन आले असून ते सर्वजण जोगेश्वरीतील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस शिपाई देवेंद्र ठाकूर यांना मिळाली होती.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त संपतराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे, पोलीस निरीक्षक श्याम पवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सम्राट वाघ, पोलीस हवालदार माने, पोलीस शिपाई देवेंद्र ठाकूर, म्हात्रे यांनी जोगेश्वरीतील हॉटेल राणा रेसीडेन्सीजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. संशयित आरोपी त्यांच्या रुम क्रमांक 101 मध्ये असल्याची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी तिथे छापा टाकला होता. यावेळी रणवीर सिंग आणि गजेंद्र सिंग या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. घटनास्थळाहून पोलिसांनी साडेतीन किलो चरसचा साठा जप्त केला, त्याची किंमत सतरा लाख सात हजार रुपये इतकी आहे.
तपासात रणवीर आणि गजेंद्र हे दोघेही उत्तरप्रदेशच्या आग्रा, शहागंज आणि अकोलाचे रहिवाशी असून दोघांचेही शिक्षण सातवीपर्यंत झाले आहेत. काही दिवसांपूर्वी ते दोघेही चरसची विक्रीसाठी उत्तरप्रदेशातून मुंबईत आले होते, मात्र चरसची विक्री करण्यापूर्वीच या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीत त्यांच्या इतर सहकार्यांची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.