27 लाखांच्या दरोड्यातील मुख्य आरोपीस दिड वर्षांनी अटक
वेशभूषा बदलून विविध ठिकाणी वास्तव्यास राहत होता
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 ऑगस्ट 2025
मुंबई, – माटुंगा येथील सुमारे 27 लाखांच्या दरोड्यातील गुन्ह्यांतील मुख्य आरोपीस दिड वर्षांनी माटुंगा पोलिसांनी अटक केली. निलेश अखिलेश श्रीवास्तव असे या 32 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेच्या भीतीने तो वेशभूष बदलून विविध ठिकाणी वास्तव्यास असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यापूर्वी याच गुन्ह्यांत सात आरोपींना चोरीच्या सर्व मुद्देमालासह पोलिसांनी अटक केली होती. यावेळी निलेशला वॉण्टेड आरोपी घोषित करण्यात आले, अखेर दिड वर्षांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
17 डिसेंबर 2023 रोजी बलरामकुमार सिंग हे त्यांच्या सहकार्यासोबत दादर रेल्वे स्थानकातून लोअर परेलला टॅक्सीने जात होते. रात्री सव्वाबारा वाजता ही टॅक्सी रामी हॉटेलजवळ येताच सहा ते सातजणांच्या टोळीने त्यांच्याावर हल्ला करुन त्यांना घातक शस्त्रांचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्यांच्याकडील 35 किलो कास्टिंग गोल्ड, गोल्ड फायलिंग डस्ट असा सुमारे 27 लाखांचा मुद्देमाल घेऊन पलायन केले होते. या घटनेनंतर बलरामकुमार सिंग यांनी माटुंगा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दरोड्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना काही दिवसांत सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी सात आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली होती. या आरोपींकडून पोलिसांनी दोन लाखांची कॅश, 126 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, सहा किलो शंभर ग्रॅम वजनाचे कास्टिंग गोल्ड व फायलिंग डस्ट आणि इतर मुद्देमाल जप्त केला होता. या दरोड्यात संबंधित् सातजणांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यांच्या चौकशीत या टोळीचा मुख्य सूत्रधार निलेश श्रीवास्तव असल्याचे उघडकीस आले होते. मात्र दरोड्याच्या गुन्ह्यानंतर तो पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. अटकेच्या भीतीने त्याने त्याचा मोबाईल बंद ठेवला होता, दाढी वाढवली होती, गेटअप बदलून तो देशभरातील विविध शहरात राहत होता.
तरीही त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केशव वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष माळी, पोलीस शिपाई देवेंद्र बहादुरे, प्रविण तोडासे, किशोर देशमाने यांनी दोन दिवसांपूर्वी वॉण्टेड असलेल्या निलेश श्रीवास्तवला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तोच या दरोड्यातील मुख्य आरोपी असल्याचे उघडकीस आले. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांनी सांगितले.