मुख्यमंत्री कोट्यासह ठाणे मनपा-स्टेट बँकेत नोकरीच्या आमिषाने गंडा
सुमारे 72 लाखांच्या अपहारप्रकरणी पिता-पूत्राविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 ऑगस्ट 2025
मुंबई, – मुख्यमंत्री कोट्यासह ठाणे मनपा आणि स्टेट बँकेत नोकरीच्या आमिषाने एका निवृत्त कंडक्टरसह त्याच्या भावांना, नातेवाईक आणि परिचितांची सुमारे 72 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार जोगेश्वरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका पिता-पूत्रासह बोगस नोकरीचे नियुक्तीपत्र देऊन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तानाजी रामचंद्र शिळीमकर आणि कुशल तानाजी शिळीमकर अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही बेरोजगार तरुणांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे या गुन्ह्यांत त्यांची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
मोहन कुंडलिक जाधव हे सातारा येथील माण, गोंदवलेचे रहिवाशी असून तिथे त्यांची स्वतची शेती आहे. ते बेस्टमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत होते. जोगेश्वरीतील मजास डेपोमध्ये कार्यरत असताना तानाजी शिळीमकरशी ओळख झाली होती. तोदेखील तिथे कंडक्टर म्हणून कार्यरत होता. यावेळी त्यांची चांगली मैत्री झाली होती. नेहमी एकमेकांच्या घरी येणे-जाणे असल्याने त्यांच्यात कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. मार्च 2022 रोजी मोहन जाधव हे बेस्टच्या सेवेतून निवृत्त झाले होते. तरीही ते तानाजीच्या संपर्कात होते. त्यांची मोठी मुलगी पूजा ही विवाहीत असून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती नोकरीच्या शोधात होती. बरेच प्रयत्न करुनही तिला चांगली नोकरी मिळाली नव्हती. ही माहिती तानाजीला होती. त्याने त्याचा मुलगा कुशल शिळीमकर हा बेरोजगार तरुणांना नोकरी मिळवून देतो.
मुख्यमंत्री कोट्यातून त्याने आतापर्यंत अनेकांना स्टेट बॅकेसह शासकीय-निमशासकीय कार्यालयात नोकरी मिळवून दिली आहे असे सांगून त्याने मोहन जाधव यांना त्यांच्या विवाहीत मुलीला स्टेट बँकेत नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या परिचित कोणालाही नोकरीची गरज असल्यास काही रक्कम खर्च करुन नोकरी देण्याचे आमिष दाखविले होते. मुलीच्या नोकरीसाठी त्याने त्यांनी त्याला पाच लाख रुपये दिले होते. काही दिवसांनी त्यांनी तिला स्टेट बँकेत नोकरी मिळाल्याचे पत्र दिले होते. त्यामुळे तानाजी आणि कुशल या पिता-पूत्रांवर त्यांचा विश्वास बसला होता. याबाबत त्यांनी त्यांच्या भावासह इतर नातेवाईकांना सांगितली होती. यावेळी मोहन जाधव यांचा भाऊ दिलीपने त्यांना त्यांची मुलगी ऋतुजा ननावरे, पुतण्या मंगेश जाधव, आनंद जाधव यांना नोकरीविषयी विचारणा केली होती. त्यांनीही बँकेतील नोकरीसाठी त्यांना पैसे देण्याची तयारी दर्शविली होती. त्यांच्या नोकरीसाठी त्यांनी शिळीमकर पिता-पूत्रांना टप्याटप्याने 28 लाख 55 हजार रुपये दिले होते.
काही दिवसांनी त्यांचे मोठे बंधॅ रामचंद्र जाधव यांच्यासह इतर परिचित नातेवाईकांनी त्यांच्याकडे नोकरीसाठी विचारणा केली होती. या नातेवाईकांनाही नोकरीचे आश्वासन देऊन त्यानी त्यांच्याकडून टप्याटप्याने पैसे घेतले होते. काही दिवसांनी त्यांची मुलगी पूजा सराटे आणि पुतण्या आनंद जाधव हे नियुक्तीपत्र दिलेल्या पत्त्यावर गेले होते, यावेळी तिथे स्टेट बँकेची कुठलीही शाखा नव्हती. याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सर्वांना नोकरी मिळणार असल्याचे सांगून त्यांच्याकडून आणखीन पैशांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर कोणालाही नोकरी किंवा पैसे परत मिळणार नाही असे सांगितले.
31 मार्च 2022 ते 23 फेब्रुवारी 2023 या कालावधीत तानाजी व त्यांचा मुलगा कुशल शिळीमकर यांनी मोहन जाधव यांच्यासह त्यांचे बंधू, नातेवाईक आणि परिचितांकडून मुख्यमंत्र्याच्या कोट्यातून मंत्रालयासह स्टेट बँक, ठाणे महानगरपालिकेतील नोकरीसाठी टप्याटप्याने 72 लाख रुपये घेतले होते. मात्र कोणालाही नोकरी न देता नोकरीसाठी दिलेल्या पैशांचा परस्पर अपहार करुन मोहन जाधव यांच्यासह इतरांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मेघवाडी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तानाजी शिळीमकर आणि कुशल शिळीमकर यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी नोकरीचे बोगस नियुक्तीपत्र देऊन सुमारे 72 लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून दोन्ही पिता-पूत्रांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही बेरोजगार तरुणांची फसवणुक केल्याचे बोलले जाते.