मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 ऑगस्ट 2025
मुंबई, – शहरात वाढत्या ड्रग्ज तस्कराविरोधात मुंबई पोलिसांनी धडक मोहीम सुरु केली आहे. या मोहीमेचा एक भाग म्हणून अलीकडेच सुधारीत करण्यात आलेल्या मोक्का कायद्याची मुंबई पोलिसांनी अंमलबजावणी सुरु केली आहे. याच गुन्ह्यांत तीन एमडी ड्रग्ज तस्करावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारे मुंबई पोलिसांनी केलेली महाराष्ट्रातील ही पहिलीच कारवाई असून या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. विशेषता एमडी ड्रग्जची वाढती मागणी पाहता एमडी ड्रग्ज तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ऑगस्ट महिन्यांत वांद्रे युनिटच्या अधिकार्यांनी एमडी ड्रग्जप्रकरणी एका मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली होती. या तिघांकडून पोलिसांनी 766 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. मुख्य आरोपीने स्वतची टोळी बनवून आपल्या सहकार्याच्या मदतीने शहरात ड्रग्जची विक्री सुरु केली होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले आहे.
अलीकडेच राज्य शासनाने अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे सुधारीत विधेयक मंजुर केले होते. त्यामुळे या तिघांनाही पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली होती. ड्रग्ज तस्करी करणार्या टोळीविरुद्ध मोक्काच्या सुधारीत कायद्यांतर्गत कारवाई होण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच कारवाई आहे. या कारवाईचा आता इतर ड्रग्ज तस्करांनी प्रचंड धसका घेतला आहे.