सवलतीच्या दरात स्वस्तात वस्तू देण्याच्या आमिषाने लेखिकेची फसवणुक

सात महिन्यांपासून फरार असलेल्या सोशल मिडीया मॅनेजर महिलेस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ एप्रिल २०२४
मुंबई, – सवलतीच्या दरात लॅपटॉप, आयपॅड, मोबाईलसह इतर वस्तू स्वस्तात देण्याच्या आमिषाने ४७ वर्षांच्या कलाकार असलेल्या लेखिकेची फसवणुक करुन पळून गेलेल्या एका सोशल मिडीया मॅनेजर महिलेस बांगुरनगर पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. हिना रमाकांत शर्मा असे या महिलेचे नाव असून ती मूळची अंबरनाथची रहिवाशी आहे. गुन्हा दाखल होताच हिना ही पळून गेली होती. अखेर सात महिन्यानंतर वॉण्टेड असलेल्या हिना शर्माला दिल्लीतून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

तक्रारदार महिला व्यवसायाने लेखक आणि कलाकार असून मालाडच्या मूव्ही टाईम सिनेमाजवळील एका पॉश अपार्टमेंटमध्ये राहते. ती मोटीव्हेशनल स्पिकिंगचे व्हिडीओ तयार करुन ते सोशल मिडीयावर अपलोड करुन लोकांना मार्गदर्शन आणि उपदेश करण्याचे काम करते. मोटीव्हेशन स्पिकिंगचे व्हिडीओ तयार करण्यासाठी तिने एप्रिल २०२२ रोजी हिना शर्मा हिला तिच्याकडे सोशल मिडीया मॅनेजर म्हणून कामावर ठेवले होते. ती तिचे व्हिडीओ आणि फोटो एडिटिंग करुन ते सोशल मिडीयावर अपलोड करत होती. यावेळी तिने तिच्याशी जवळीक निर्माण करुन तिचा विश्‍वास संपादन केला होता. काही दिवसांनी तिचा ऍपल कंपनीचा लॅपटॉप खराब झाला होता. त्यामुळे हिनाने तिला तिच्या परिचित अनिल डिस्टिब्युटर नावाचे अंबरनाथ येथे दुकान असून ते दुकान त्याच्या बालपणीच्या मित्राचे आहे. त्याच्याकडे ऍपल कंपनीचे लॅपटॉप, सॅमसंग कंपनीचे मोबाईल, आयॅपड, घड्याळासह इतर सर्व वस्तू १५ ते २० टक्के सवलत दरात तिला मिळवून देते. त्याच्याकडे थेट कंपनीच्या वस्तूची डिलीव्हरी होत असल्याने त्यात तिची फसवणुक होणार नाही असे सांगितले होते. तिच्यावर विश्‍वास ठेवून तिने तिच्याकडे लॅपटॉप, मोबाईल, आयपॅडसह इतर वस्तू खरेदीसाठी पावणेचार लाख रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत तिने तिच्या वस्तूची डिलीव्हरी केली नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर ती विविध कारण सांगून तिला टाळण्याचा प्रयत्न करत होती. मित्राच्या गोदामातून वस्तू पॅक झाले आहे. येत्या एक-दोन दिवसांत तिच्या सामानाची डिलीव्हरी होईल असे सांगूनही तिने तिच्या वस्तूची डिलीव्हरी केली नाही.

हिनाकडून आपली फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच तिने तिच्याविरुद्ध बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तपासात हिना ही अंबरनाथ येथे राहत होती. मात्र गुन्हा दाखल झाल्याचे समजताच ती पळून गेली होती. गेल्या सात महिन्यांपासून ती पोलिसांा सतत गुंगारा देत होती. त्यामुळे तिच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच हिना ही दिल्लीत पळून गेल्याची माहिती पोलिसांना समजली होती. या माहितीनंतर या पथकाने दिल्लीतून हिनाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान तिने या गुन्ह्यांची कबुली दिली. मौजमजा करण्यासाठी तिने तक्रारदार महिलेची फसवणुक केली होती. पोलिसांनी पकडू नये म्हणून ती सतत तिच्या वास्तव्याची जागा बदलत होती. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीकडे नोकरी मिळवून ती त्यांचा विश्‍वास संपादन करत होती. त्यानंतर त्यांना स्वस्तात वस्तू मिळवून देते असे सांगून ती संबंधित व्यक्तीची फसवणुक करत होती. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर तिला बोरिवलतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. तिने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page