कौटुंबिक वादावर उपचाराच्या बहाण्याने विवाहीत महिलेवर अत्याचार
गुन्हा दाखल होताच 36 वर्षांच्या भोंदूबाबाला नवी मुंबईतून अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 ऑगस्ट 2025
मुंबई, – जादूटोणा आणि तंत्रमंत्राच्या सहाय्याने पती-पत्नी यांच्यातील कौटुंबिक वादावर कायमचा उपाययोजना करण्याचा बहाणा करुन एका विवाहीत महिलेवर तिच्याच परिचित भोंदूबाबाने लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार सांताकुज परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह लैगिंक अत्याचारासह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा, जादूटोणा अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच 36 वर्षांच्या भोंदूबाबाला सांताक्रुज पोलिसांनी अटक केली. अब्दुर रशीद अब्दुल लतिफ शेख ऊर्फ बाबाजान असे या भोंदूबाबाचे नाव असून तो मूळचा नवी मुंबईचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने अशाच प्रकारे उपचाराच्या बहाण्याने काही महिलांचे लैगिंक शोषण केले आहेत का याचा तपास सुरु असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार सावंत यांनी सांगितले.
पिडीत विवाहीत महिला ही सांताक्रुज येथे राहते. गेल्या काही महिन्यांपासून तिच्यासह तिच्या पतीमध्ये कौटुंबिक वाद सुरु होते. त्यातून घरात नेहमीच खटके उडत होते. ऑगस्ट 2024 रोजी तिची अब्दुर शेख या भोंदूबाबाशी ओळख झाली होती. त्याची भेट घेतल्यानंतर तिने तिच्या पतीसोबत सुरु असलेल्या कौटुंबिक वादाबाबत सविस्तर माहिती दिली होती. ही माहिती ऐकल्यांनतर त्याने तंत्रमंत्रासह जादूटोण्यासह सर्व समस्यावर उपचार करण्याचे आश्वासन देत त्याने तिला त्यांच्यातील वाद कायमचे मिटविण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी तिच्यावर उपचार करण्याची गरज आहे, मात्र तिची बहिण तिच्यावर उपचार करु देणार नाही. त्यामुळे त्याने तिला उपचारासाठी खालापूर, महाड आणि नवी मुंबई येथील त्याच्या राहत्या घरी बोलाविले होते. तिथेच तिला तिच्या शरीरात नेगीटिव्ह एनर्जी असल्याचे सांगून ती उतरविण्यासाठी काळी जादू करावी लागेल असे सांगून तिला अगरबत्तीचा वास देऊन बेशुद्ध केले. बेशुद्धावस्थेत असताना त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता.
ऑगस्ट 2024 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार नंतर तिच्या लक्षात आला होता. तसेच त्याच्या उपचारातून तिच्या कौटुंबिक जीवनात काहीच फरक पडला नव्हता. उपचाराच्या नावाने त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याने तिने घडलेला प्रकार सांताक्रुज पोलिसांना सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अब्दुर शेख याच्याविरुद्ध पोलिसांनी 64, 74, 76, 115, 118 (1), 123, 351 (2) भारतीय न्याय सहिता सहकलम 3 महाराष्ट्र नरबळी, इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रस्था व जादूटोणा यांना प्रतिबंधक घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या घटनेची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त मारुती पंडित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, पोलीस निरीक्षक ज्योती हिबारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार सावंत, महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली चव्हाण, पोलीस हवालदार अभिषेक कर्ले, पोलीस शिपाई मारुती गावडे, मनोज पाटील, प्रसाद यादव व स्वप्निल काकडे यांनी तपास सुरु केला होता. आरोपी भोंदूबाबाच्या मोबाईलचे सीडीआर काढून त्याचा शोध सुरु करण्यात आला होता. त्याच्या लोकेशनवरुन तो नवी मुंबईत वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार सावंत यांच्यासह अन्य पोलीस पथकाने कळंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल चौगुले, पोलीस हवालदार पवार, झोपडे यांच्या मदतीने अब्दुर शेख याला नवी मुंबईतील कळंबोली येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच कौटुंबिक वादावर कायमचा तोडगा काढण्यासाठी पिडीत महिलेशी जवळीक साधून तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची कबुली दिली होती. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
अब्दुर हा नवी मुंबईतील कळंबोली, डी मार्ट रोड, सेक्टर दहा, समन टॉवरच्या फ्लॅट क्रमांक 701 मध्ये राहतो. तिथे तो मांत्रिक म्हणून सांगत होता. अनेक समस्यावर त्याच्याकडे उपचार आहे. तंत्रमंत्र-जादूटोण्याच्या माध्यमातून त्याच्याकडे येणार्या लोकांना तो त्यांचे समस्यावर कायमचा तोडगा काढण्याचे आश्वासन देऊन त्यांची फसवणुक करत होता. त्याने पिडीत महिलेसह इतर काही महिलांवर लैगिंक अत्याचार केला आहे का याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.