मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 ऑगस्ट 2025
मुंबई, – औषधांच्या बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफारसह काही बिल डिलीट करुन कंपनीच्या बँक खात्यात पेमेंट न घेता वैयक्तिक बँक खात्यात पेमेंट घेऊन मेडीकल शॉपच्या सुमारे 14 लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी जितेंद्रबहादूर श्यामराज यादव या मुख्य फार्मासिस्ट कर्मचार्याला एक वर्षांनी समतानगर पोलिसांनी अटक केली. फसवणुकीनंतर अटकेच्या भीतीने जितेंद्र हा गेल्या एक वर्षांपासून सतत स्वतचे वास्तव्य बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर त्याला सोमवारी अटक करण्यात पोलिसांना यश आले असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
श्रीकांत भिवा सर्वगोड हे कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरात राहत असून त्यांचा वैद्यकीय व्यावसायिक म्हणून परिचित आहेत. त्यांची पॅरामाऊंट गणपती मेडीकेअर प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी असून या कंपनीत त्यांच्यासह त्यांची पत्नी विद्या सर्वगोड या संचालक म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीमार्फत पीजीएम फार्मा, पीजीएम डायग्नेस्टिक आणि पीजीएम स्पेशलिटी क्लिनिक असे उपक्रम चालविले जातात. त्यांचे मेडीकल 24 तास चालत असून तिथे तीन शिफ्टमध्ये काम होते. याच कंपनीत जितेंद्र शयादव हा मुख्य फार्मासिस्ट म्हणून कामाला होता. त्याच्यावर मेडीकल शॉपमधील औषधे खरेदी-विक्री करणे, शॉपची देखरेख ठेवणे आदी कामाची जबाबदारी होती.
7 जुलैला त्यांच्या मेडीकल शॉपमध्ये एक महिला आली होती. तिने 1930 रुपयांचे औषध घेतली होती. ते औषधे परत करुन तिला ही रक्कम परत देण्यात आले. मात्र बिलाची तपासणी केल्यानंतर त्यात दहा रुपयांची एक बिसलेरी घेण्यात आल्याचे नोंद होती. त्यात जितेंद्र यादवची स्वाक्षरी होती. या प्रकारानंतर त्यांच्या मेडीकल शॉपमध्ये आर्थिक गैरव्यवहार सुरु असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या दुकानातील आर्थिक व्यवहाराची ऑडिट करण्याचे ठरविले होते. तसेच बिलिंग सॉफ्टवेअर डाऊनलोड आणि देखभाल करणार्या कंपनीला तपास करण्याची विनंती केली होती. या चौकशीत त्यांच्या मेडीकल शॉपमधील सॉफ्टवेअरमध्ये मोठ्या प्रमााणात फेरफार तसेच काही बिल डिलीट झाल्याचे उघडकीस आले. ते सर्व बिले पुन्हा प्राप्त करण्यात आले होते.
गेल्या दोन वर्षांत जितेंद्र यादवने संगणकामधील औषधांच्या बिलामध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करुन कमी रक्कमेचे बिल दाचवून तसेच काही बिल डिलीट करुन पैशांचा अपहार केल्याचे उघडकीस आले होते. कंपनीच्या बँक खात्यात पैसे न देता जितेंद्रने स्वतच्या वैयक्तिक बँक खात्यात औषधांच्या बिलांचे पेमेंट घेतले होते. जानेवारी 2023 ते जुलै 2024 या कालावधीत त्याने 13 लाख 89 हजार 768 रुपयांचा परस्पर अपहार करुन कंपनीची फसवणुक केली होती. याबाबत जितेंद्रकडे त्यांनी खुलासा मागितला होता. याबाबत कुठलाही खुलासा न देता तो कामावरुन निघून गेला आणि परत आला नाही. त्याने त्यांचे कॉल घेणे बंद केले होते.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच श्रीकांत सर्वगोड यांनी समतानगर पोलिसांत जितेंद्रविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच जितेंद्र हा पळून गेला होता. गेल्या एक वर्षांपासून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. अखेर सोमवारी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. चौकशीत त्याने मेडीकल शॉपच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.