कुशीनगर एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलाच्या हत्येने खळबळ
कौटुंबिक वादातून मावस भावानेच हत्या केल्याचा संशय
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 ऑगस्ट 2025
मुंबई, – उत्तरप्रदेशच्या गोरखपूर येथून शनिवारी पहाटे कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकात आलेल्या कुशीनगर एक्सप्रेसमध्ये एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत मुलाची ओळख पटली असून तो मूळचा सुरतचा रहिवाशी आहे. कौटुंबिक वादातून त्याचे त्याच्या मावस भावाने अपहरण करुन हत्या करुन नंतर त्याच्या हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. याप्रकरणी लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे पोलिसांनी मावस भावाविरुद्ध अपहरणासह हत्या आणि हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या भावाच्या अटकेसाठी स्थानिक रेल्वे पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस या दरम्यान धावणारी कुशीनगर एक्सप्रेस शनिवारी सकाळी कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकात आली होती. सर्व प्रवाशी उतरल्यानंतर सफाई कर्मचार्यांनी एक्सप्रेसची साफसफाईचे काम हाती घेतले होते. बी-दोन या वातानुकूलित डब्ब्याची सफाई करताना तेथील स्वच्छागृहात एका कर्मचार्याला पाच ते सहा वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला. या प्रकाराने तो प्रचंड घाबरला आणि त्याने ही माहिती स्थानिक रेल्वे पोलिसांना दिली.
या माहितीनंतर रेल्वे पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या मुलाला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याच दरम्यान सुरत पोलिसांची एक टिम मुंबईत आली होती. या पोलिसांच्या जबानीवरुन मृत मुलगा गुजरातच्या सुरतचा रहिवाशी असून त्याच्या पालकांनी त्याच्या मिसिंगची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मुलगा त्याच्या मावस भावासोबत होता. शुक्रवारी ते दोघेही खुशीनगर एक्सप्रेसने प्रवास करत होते. ही माहिती प्राप्त होताच सुरत पोलीस त्यांच्या मागावर होती.
मात्र मुंबईत आल्यानंतर त्यांना अपहरण झालेल्या मुलाची हत्या झाल्याचे समजले. ही माहिती त्याच्या पालकांना देण्यात आली असून मुलाच्या आईसह इतर कुटुंबिय मुंबईत दाखल झाले आहे. मृत मुलाचा मृतदेह दाखविल्यानंतर त्याच्या आईने तोच तिचा मुलगा असल्याचे ओळखले आहे. या घटनेनंतर आरोपी भावस भाऊ पळून गेला असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. कौटुंबिक वादातून आरोपीने अल्पवीन मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या केल्याचे बोलले जाते. हत्येनंतर तो त्याचा मृतदेह एक्सप्रेसच्या स्वच्छतागृहात टाकून पळून गेला होता. या वृत्ताला पोलिसांकडून दुजोरा देण्यात आला आहे.