साडेसोळा लाखांच्या ड्रग्ज तस्करीप्रकरणी आरोपी दोषी
पंधरा वर्षांच्या कारावासासह एक लाखांचा दंडाची शिक्षा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 ऑगस्ट 2025
मुंबई, – एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या समीर शब्बीर शेख ऊर्फ समीर पाणीपुरी याला विशेष सेशन कोर्टाने दोषी ठरविले. ड्रग्ज तस्करीच्या याच गुन्ह्यांत त्याला कोर्टाने पंधरा वर्षांच्या कारावासासह एक लाख रुपयांचा दंड, दंडाची रक्कम न भरल्यास आणखीन सहा महिने कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
मे 2022 राजी समीर पाणीपुरी याला वांद्रे युनिटच्या अॅण्टी नारकोटीक्सच्या अधिकार्यांनी एमडी ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी 110 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. त्याची किंमत साडेसोळा लाख रुपये इतकी होती. तपासात समीर पाणीपुरी हा ड्रग्ज पेडलर असून तो शहरात एमडी ड्रग्जची विक्री करत असल्याचे उघडकीस आले होते. तपासात तो सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले होते.
त्याच्याविरुद्ध एनडीपीएस, जबरी चोरी, विनयभंगासह इतर दहाहून अधिक गुन्ह्यांची माहीम पोलीस ठाण्यात नोंद होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करुन त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत त्याच्याविरुद्ध विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या खटल्याची नियमित सुनावणी कोर्टात सुरु होती. अलीकडेच या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन कोर्टाने त्याला एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी दोषी ठरविले होते. शुक्रवारी त्याला कोर्टाने पंधरा वर्षांच्या कारावासासह एक लाख रुपयांचा दंड, दंडाची रक्कम न भरल्यास आणखीन सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
या गुन्ह्यांचा तपास पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालिन प्रभारी पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे, तपास अधिकारी-सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कारकर, पोलीस शिपाई अतुल सौंदाणे यांनी केला तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार रंगनाथ घुगे, महिला पोलीस हवालदार मोहना आव्हाड, महिला पोलीस शिपाई दिप्ती दरेकर, सुदक्षिना नेहे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.