ड्रग्जविरोधी कारवाईदरम्यान दोन पोलिसांवर गर्दुल्याकडून हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत सातही हल्लेखोरांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 ऑगस्ट 2025
मुंबई, – ड्रग्जविरोधी कारवाईदरम्यान गस्त घालताना देवनार पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांवर सहा ते सात गर्दुल्ल्यांनी लाथ्याबुक्यासह दगडाने तसेच चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना गोवंडी परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात पोलीस शिपाई योगेश सुधाकर सूर्यवंशी आणि पोलीस हवालदार अशोक भालेराव जखमी झाले असून त्यांच्यावर चेंबूरच्या सुराणा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अफान ऊर्फ बिल्डर, साहिबेआलम सावंत ऊर्फ डॅनी, जिशान खान ऊर्फ जिशू, शोएब खान ऊर्फ गबरु, कैफ, शमशू आणि जिदान ऊर्फ जॅकी अशा सातजणांविरुद्ध देवनार पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह शिवीगाळ करुन मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सातही आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांना सोमवारी दुपारी लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.
ही घटना शनिवारी रात्री साडेदहा ते पावणेअकराच्या सुमारास गोवंडीतील देवनार, बाळासाहेब ठाकरे उद्यानाजवळ घडली. योगेश सूर्यवंशी हे कल्याण येथील रहिवाशी असून सध्या देवनार पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेत पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी ते रात्रपाळीवर हजर झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक विशाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक साळुंखे पोलीस हवालदार अशोक भालेराव, पोलीस शिपाई विशाल पाटील, चंद्रकांत सोनावणे आदी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. रात्री दोन-दोन पोलिसांचे पथक गोवंडीतील मोकळी मैदान, निर्जनस्थळी आणि ओव्हरब्रिजजवळ ड्रग्जविरोधी कारवाईसाठी गस्त घालत होते.
रात्री उशिरा साडेदहा वाजता देवनार सर्कल, देवनार कॉलनी रोडने झाकीर हुसैन नगराजवळ बाळसाहेब ठाकरे उद्यानात गस्त घालत असताना सूर्यवंशी आणि भालेराव यांना काही तरुण ड्रग्जचे सेवन करत असल्याचे दिसून आले. त्यात पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार शोएब खान, साहिबेआलम सावंत, जिशान खान, कैफ, अफान आदींचा समावेश होता. त्यामुळे योगेश सूर्यवंशी आणि अशोक भालेराव त्यांच्यावर कारवाईसाठी गेले होते. यावेळी पोलिसांना पाहताच ते सर्वजण पळू लागले. पळून जाणार्या तिघाना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पोलीस ठाण्यात नेत असताना अचानक त्यांच्यावर त्यांच्या इतर सहकार्यांनी दगडफेक केली होती.
स्वतला सावरत असताना तिथे अफान आला आणि त्याने त्याच्याकडील चाकूने योगेश सूर्यवंशी यांच्यावर हल्ला केला. यावेळी अशोक भालेराव यांनी दगडफेक करणार्या शोएब खान आणि अफान यांना जोरात ढकळले. त्यामुळे त्यांची पकड ढिली झाली आणि त्यांच्या ताब्यातील तिन्ही आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळू लागले. यावेळी या आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ करुन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केल्यानंतर त्यांनी पुन्हा पोलिसांवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. अचानक झालेल्या आरडाओरडानंतर ते सर्वजण तेथून पळून गेले.
ही माहिती मिळताच इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तिथे दाखल झाले होते. हल्ल्यात योगेश सूर्यवंशी आणि अशोक भालेराव जखमी झाल्याने त्यांना तातडीने चेंबूरच्या सुराणा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी योगेश सूर्यवंशी यांच्या जबानीवरुन पोलिसांनी सातही आरोपीविरुद्ध भारतीय न्याय सहिता कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गस्त घालणार्या पोलीस पथकावर गर्दुल्याकडून झालेल्या हल्ल्याच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेचे आदेश देवनार पोलिसांना दिले होते. या आदेशांनतर पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. रविवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी हल्ला करणार्या सातही आरोपींना गोवंडीतील देवनार परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.