शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने डॉक्टरची 25 लाखांची फसवणुक
सायबर ठगांना मदत करणार्या दोघांना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 ऑगस्ट 2025
मुंबई, – चांगला परतावा देतो असे सांगून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन एका वयोवृद्ध डॉक्टरला सुमारे 25 लाखांना गंडा घातल्याप्रकरणी दोन आरोपींना पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. प्रशांत चौधरी आणि रिचर्ड राव अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही काही सायबर ठगांच्या संपर्कात होते. फसवणुकीसाठी त्यांनी या सायगर ठगांच्या सांगण्यावरुन विविध बँकेत खाती उघडून दिले होते. याच खात्यात फसवणुकीची रक्कम जमा होत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने मंगळवार 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
79 वर्षांचे वयोवृद्ध डॉक्टर रोहित मनसुखलाल शाह हे पवईतील हिरानंदानी गार्डन परिसरात राहतात. त्यांची हार्डकार्ब टेक्नोलॉजिक प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक खाजगी कंपनी असून या कंपनीत ते संचालक म्हणून कामाला आहे. 17 जुलैला त्यांच्या व्हॉटअपवर एक शेअरसंदर्भातील जाहिरात आली होती. या मॅसेजमध्ये एका खाजगी कंपनीच्या कस्टमर केअरचा मोबाईल क्रमांक होता. त्यांना कंपनीच्या ग्रुपमध्ये अॅड केल्यानंतर ग्रुपमध्ये दररोज विविध शेअरच्या अॅनालिसीस करुन माहिती दिली होती. याच दरम्यान त्यांना ग्रुप अॅडमिनने संपर्क साधून त्यांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास आपण इच्छुक आहात का याबाबत विचारणाक केली होती. त्यांनी होकार दर्शविल्यानंतर त्यांच्या नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग वेबपेजवर एक आयडी पासवर्ड बनविण्यातआले होते. त्यानंतर एक महिला त्यांना विविध शेअरची माहिती सांगून या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला परतावा मिळेल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत होती.
चांगल्या परताव्याच्या आमिषाने त्यांनी शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास सुरुवात केली होती. जुलै महिन्यांत त्यांनी विविध शेअरमध्ये सुमारे 25 लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा झाला होता. त्यामुळे त्यांनी काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, मात्र वारंवार प्रयत्न करुनही त्यांना पैसे काढता आले नाही. याबाबत ग्रुप अॅडमिनसह संबंधित महिलेकडे विचारणा करुनही त्यांच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यांचा स्कोर कमी असून त्यांना आणखीन रक्कम शेअरमध्ये गुंतवणुक करावी लागेल. त्यानंतर त्यांना त्यांची रक्कम परत मिळेल असे सांगत होते. मात्र त्यांनी आणखीन रक्कम शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना गुंतवणुकीसह परताव्याची रक्कम देण्यास त्यांनी नकार दिला होता.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना प्रशांत चौधरी आणि रिचर्ड राव या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्यांच्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा झाली होती.
फसवणुकीसाठी त्यांनीच त्यांच्या परिचित सायबर ठगांना बँक खाती पुरविली होती. याच बँक खात्यात या गुन्ह्यांसह इतर गुन्ह्यांतील रक्कम ट्रान्स्फर झाली होती. ही रक्कम संबंधित सायबर ठगांना दिल्यानंतर त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन मिळाले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.