मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 ऑगस्ट 2025
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका टेम्पोच्या धडकेने नूर फातिमा मोहम्मद मुस्तफा खान या चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घाटकोपर परिसरात घडली. अपघातानंतर पळून गेलेल्या टेम्पोचालकास काही तासांत घाटकेापर पोलिसांनी अटक केली. फईमउल्ला शेख असे या आरोपी टेम्पोचालकाचे नाव असून अटकेनंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा अपघात शनिवारी सायंकाळी चार वाजता घाटकोपर येथील एन. एस रोड, नारायण नगर, दौलत बेकरीजवळ झाला. याच परिसरात हसीना खातून खान ही तिचा पती मोहम्मद मुस्तफा, तिचे मुले सबाना (15), मोहम्मद रेहान (13), मोहम्मद हस्सान (7) आणि मृत मुलगी नूर फातिमा (4) यांच्यासोबत राहते. तिचे पती पीओपीचे काम असून त्याच्याच उत्पनानावर तिच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. शनिवारी सायंकाळी चार वाजता ती घरात काम करत होती. यावेळी तिची मुलगी नूर फातिमा ही घरासमोरच खेळण्यासाठी गेली होती. यावेळी तेथून भरवेगात जाणार्या एका टेम्पोने नूर फातिमाला धडक दिली होती.
टेम्पोच्या चाकाखाली आल्याने ती गंभीररीत्या जखमी झाली होती. हा प्रकार स्थानिक रहिवाशांना दिसताना त्यांनी अपघातात जखमी झालेल्या नूर फातिमाला तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला सायंकाळी सहा वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर आरोपी टेम्पोचालक जखमी मुलीला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा पोलिसांना अपघाताची माहिती न देता पळून गेला होता. अपघाताची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी हसीना खातून हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी टेम्पोचालकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हलगर्जीपणाने टेम्पो चालवून एका चार वर्षांच्या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या फईमउल्ला शेख या टेम्पोचालकास पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याला नंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले.