घरफोडीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीसह तिघांना अटक
दोन गुन्ह्यांची उकल करुन आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 ऑगस्ट 2025
कल्याण, – घरफोडीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका रेकॉर्डवरील आरोपीसह त्याच्या दोन सहकार्यांना महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली. त्यात एका महिलेचा समावेश असून या तिघांच्या अटकेने घरफोडीच्या दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तिन्ही आरोपींकडून चोरीचा सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. साजिद अकबर शेख, प्रिती कदम आणि ऋषिकेश चौधरी अशी या तिघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील तक्रारदार कल्याणच्या वालधुनी परिसरात राहतात. 16 एप्रिल 2025 रोजी त्यांच्या घरी कोणीही नसताना चोरी झाली होती. अज्ञात व्यक्तीने फ्लॅटच्या मुख्य प्रवेशद्वाराची कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला होता. त्यानंतर बेडरुम आणि किचनमधील लोखंडी कपाटाचा लॉक तोडून विविध सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर वस्तू असा 12 लाख 69 हजाराचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच तक्रारदारांनी महात्मा फुले चौक पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
कल्याणमध्ये दिवसा-रात्री होणार्या घरफोडीची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीरामसिंग परदेशी, पोलीस निरीक्षक विजय नाईक यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील भुजबळ, पोलीस हवालदार साळुंखे, तडवी, वडगावे, कोळी, जाधव यांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. या फुटेजवरुन साजिद शेख आणि सावेज शेख याचे नाव समोर आले होते. त्यांचा शोध सुरु असतानपा यातील साजिद शेख याला नालासोपारा येथून पोलिसांनी अटक केली.
चौकशीत त्यानेच सावेजच्या मदतीने ही घरफोडी केल्याची तसेच चोरीच्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रिती कदम आणि ऋषिकेश चौधरी यांनी मदत केल्याचे सांगितले. या माहितीनंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. या तिघांच्या अटकेनंतर सावेज शेख हा पळून गेला होता. त्यामुळे त्याला या गुन्ह्यांत वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी साडेसहा लाखांचे सोन्याचे दागिने, ऐंशी हजारांची एक किलो चांदीचे अकरा कॉईन आणि एक वीट असा सात लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्या चौकशीत महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील अन्य एका घरफोडीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. या गुन्ह्यांतील साठ हजाराची सोन्याची लगड पोलिसांनी जप्त केली आहे. कुठलाही पुरावा नसताना चार महिन्यांपासून घरफोडीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करणार्या पोलीस पथकाचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी कौतुक केले आहे.