पुण्याच्या चंदूमामा सराफ यांचे नाव घेऊन दागिन्यांचा अपहार
दोन गुन्ह्यांची उकल करुन वॉण्टेड असलेल्या आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 ऑगस्ट 2025
मुंबई, – पुण्याच्या प्रसिद्ध चंदूमामा सराफ यांचे नावासह त्यांच्या जीएसटी सर्टिफिकेटचा गैरफायदा घेऊन ज्वेलर्स व्यापार्याकडून घेतलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करणार्या एका वॉण्टेड मुख्य आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. कार्तिक पंकज शहा ऊर्फ जैन असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कार्तिकच्या अटकेने सुमारे 31 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून या दोन्ही गुन्ह्यांतील शंभर टक्के मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे.
चंदूमामा सराफ हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांचे पुण्यासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी ज्वेलर्स शॉप आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो आंतरराष्ट्रीय हिरे परिक्षण संस्थेचा पदाधिकारी असल्याचे सांगितले होते. त्यांचे जीएसटी सर्टिफिकेट अपडेट करण्याचा बहाणा करुन त्याने त्यांचे जीएसटी सर्टिफिकेट घेतले होते. या सर्टिफिकेटचा नंतर त्याने फसवणुकीचा वापर करण्यास सुरुवात केली होती. सोन्याचे दागिने बनविणार्या कंपन्यासह ज्वेलर्स व्यापार्यांना कॉल करुन तो स्वतला चंदूमामा सराफ असल्याचे सांगत होता. त्यांचे नवीन दोन शोरुममध्ये सुरु झाले असून त्यासाठी त्याला सोन्याचे दागिने हवे आहेत असे सांगून दागिन्यांची ऑर्डर देत होता. त्यांचा विश्वास बसावा म्हणून तो त्यांना चंदूमामा सराफ यांचे जीएसटी सर्टिफिकेट पाठवत होता.
अशा प्रकारे त्याने मनी ज्वेल्स एक्सपर्ट विथ बेटर डायमंड या कंपनीतून 27 लाख रुपयांचे आणि कलिस्ता ज्वेलर्सकडून 4 लाख 58 हजार रुपयांचे असे 31 लाख 58 हजार रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने घेतले होते. मात्र त्याचे पेमेंट न करता दागिन्यांचा अपहार करुन दोन्ही व्यापार्यांची फसवणुक केली होती. या दोन्ही घटनेनंतर संबंधित तक्रारदार व्यापार्यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
आरोपीच्या अटकेसाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक यश पालवे, पोलीस हवालदार नलावडे, पोलीस शिपाई जाधव, माळी, पवार, जगताप आदींचे एक विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन सोमवारी कार्तिक शहा याला पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्याने स्वतला चंदूमामा सराफ असल्याचे सांगून त्यांचे जीएसटी सर्टिफिकेटचा गैरवापर करुन ही फसवणुक केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन्ही गुन्ह्यांतील शंभर टक्के हिरेजडीत सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.